'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:56 IST2025-09-22T12:55:39+5:302025-09-22T12:56:17+5:30
दोन्ही अभिनेत्रींनी नाटकाविषयी आपला अनुभव शेअर केला आहे.

'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली...
'संगीत देवबाभळी' हे मराठी नाटक खूप गाजत आहे. बऱ्याच वर्षांपासून हे नाटक सुरु आहे. मधल्या काळात नाटक बंद होणार अशीही चर्चा झाली होती. मात्र पुन्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायला लागल्याने प्रयोग वाढवले. नुकताच नाटकाचा ६७५ वा प्रयोग झाला. प्राजक्त देशमुखने लिहिलेल्या या नाटकात शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघींनी भूमिका केल्या आहेत. दोघींचं रंगभूमीवर उत्तम सादरीकरण, लाईव्ह गायन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. मात्र इतके प्रयोग सुरु असताना पडद्यामागे दोघींमध्ये कधी भांडणं होतात का? यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
'संगीत देवबाभळी'ची टीम नुकतीच 'मुंबई तक'च्या चावडीवर आली होती. यावेळी शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी आपले अनुभव सांगितले. मानसी म्हणाली, "मला वाटतं मी आतापर्यंत ज्या नाटकात काम केलंय तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की हे नाटक छान आहे. आपल्याला करायला मजा येईल. मला जर मजा येतीये त्याला यश किंवा त्याचं पुढे काहीतरी चांगलंच होतं असा माझा अनुभव राहिला आहे. मी तेच प्रमाण मानून काम करते. हे नाटक जेव्हा वाचलं की हे खूप भारी आहे. यातली भाषा, ह्युमर, मांडण्याची पद्धत वेगळी आहे. तसंच दोघीच जणी आहेत म्हटल्यावर जास्त संवाद असणार आहेत हे सगळं मला तेव्हा वाटलं होतं आणि म्हणूनच मी नाटकाला होकार दिला होता."
शुभांगी म्हणाली, "मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट पाहिली तेव्हा हे एवढं पाठ करायचं आहे इथूनच माझी सुरुवात होती. नंतर मी वाचत गेले तेव्हा मजा यायला लागली. हे काहीतरी वेगळं होईल हा अंदाज मला आला नव्हता. पण स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो आणि कौतुक व्हायला लागलं तेव्हा कळलं की हे काहीतरी भारी होतंय. नंतर हे व्यावसायिक नाटक झालं, प्रेक्षकांना आवडायला लागलं आणि त्याची मजा मला यायला लागली."
एकत्र काम करताना भांडणं होतात का? यावर मानसी जोशी म्हणाली, "होतात, ते मतभेद असतात. पण दोघी मुली आहेत म्हणून नाही. आमच्या एकीच्याही जागी कोणी पुरुष जरी असता तरी भांडणं झाली असती. माणूस आहे म्हणजे भांडणं होणारच."