‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्याची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:06 IST2023-11-20T16:05:25+5:302023-11-20T16:06:05+5:30
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत आता 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्याची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत आता २५ वर्षांनी कथानक पुढे गेल्याचं पाहायला मिळणार आहे. जयदीप आणि गौरीच्या पुर्नजन्माची कथा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत दाखविण्यात येणार आहे. मालिकेत अनेक पात्रांची या कथेतून एक्झिट होणार आहे. तर अनेक नवीन पात्र सुख म्हणजे नक्की काय असतंच्या येणाऱ्या भागात दिसणार आहेत.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत आता 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत अभिनेता अमेय बर्वे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सहकुटुंब सहपरिवार'मध्ये त्याने वैभवची भूमिका साकारली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. आता 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
या मालिकेत गौरी आणि जयदीपच्या पूर्नजन्माबरोबरच त्यांची प्रेमकहानी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नवीन कथेत गौरी नित्या तर जयदीप अधिराज ही भूमिका साकारणार आहे. नित्या ही शहरात राहणारी मॉडर्न मुलगी तर अधिराज गावकडच्या मातीत रमणार रांगडा गडी अशा व्यक्तिरेखेत दिसणार आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असते' मालिकेत हर्षदा खानविलकरही दिसणार आहेत. या मालिकेत त्या सरपंचाची भूमिका साकारणार आहेत.