देव करो पैसे न देणारी जमात नष्ट होवो...! शशांक केतकरला पाठिंबा देत प्रसिद्ध अभिनेत्रीची कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:26 IST2026-01-06T11:25:48+5:302026-01-06T11:26:34+5:30
शशांक केतकरच्या पोस्टवर कोणाकोणाच्या कमेंट्स?

देव करो पैसे न देणारी जमात नष्ट होवो...! शशांक केतकरला पाठिंबा देत प्रसिद्ध अभिनेत्रीची कमेंट
अभिनेता शशांक केतकर सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत तो मुख्य भूमिकेत होता. मंदार देवस्थळींनी मालिकेची निर्मिती केली होती. तेव्हापासून आजपर्यंत शशांक केतकरला त्याचे काही पैसे मिळालेले नाहीत. याविरोधात शशांकने तेव्हाही आवाज उठवला होता. आता इतक्या वर्षांनी शशांक पुन्हा आक्रमक झाला आहे. सोशल मीडियावर मंदार देवस्थळींसोबतचे चॅट्सच त्याने पोस्ट केले आहेत. शशांकला इंडस्ट्रीतील अनेकांनी पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री ऋजुता देशमुखनेही कमेंट केली आहे.
शशांक केतकरच्या पोस्टवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. हे कलाकारही त्याच परिस्थितीतून जात असल्याचं त्यांनी मांडलं आहे. तर काहींनी शशांकला जाहीर पाठिंबाही दिला आहे. अभिनेत्री ऋजुता देशमुखने कमेंट करत लिहिले, "तू बरोबर आहेस!! तू बोलतोस, हे मला प्रचंड कौतुकास्पद वाटतं. देव करो, आणि तुझे सगळे पैसे मिळो! शिवाय देव करो आणि आपल्या क्षेत्रातली पैसे न देणारी जमात नष्ट होवो. आपल्या कामाचे पैसे सतत भीक मागितल्यासारखे मागावे लागतात हे दुःखद आहे. आणि हे कधी संपणारे कोणास ठाऊक!! All positivity to you Shashank."

दुसरीकडे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनेही कमेंट करत तिच्या नवऱ्याला टॅग केलं आहे. तिचा नवरा कुणाल भगत संगीतकार आहे. 'तुझे ज्यांनी बुडवलेत त्यांची नावं लिहू का मी इथे?' अशी कमेंट तिने केली आहे. याशिवाय विदिशा म्हसकर, पार्थ घाटगे, संग्राम समेळ या कलाकारांचेही पैसे अडकले आहेत. शशांकने सर्वांना आपल्या पैशांसाठी आवाज उठवायला सांगितलं आहे. तसंच इंडस्ट्रीत चांगले निर्मातेही आहेत त्यामुळे आपल्याला काम मिळणं बंद होणार नाही असाही विश्वास त्याने दाखवला आहे.