Video: "मला भाऊ म्हणू नका"; दीपाली सय्यदचा 'तो' एक शब्द आणि रितेश देशमुख चांगलाच भडकला, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:46 IST2026-01-18T13:45:36+5:302026-01-18T13:46:26+5:30
भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने दीपाली सय्यदला चांगलंच फटकारलं. दीपालीने केलेला उल्लेख रितेशला अजिबात आवडला नाही. काय घडलं?

Video: "मला भाऊ म्हणू नका"; दीपाली सय्यदचा 'तो' एक शब्द आणि रितेश देशमुख चांगलाच भडकला, काय घडलं?
'बिग बॉस मराठी ६' मध्ये काल शनिवारी पहिला भाऊचा धक्का पार पडला. या धक्क्यावर रितेश देशमुखने सर्व सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. रितेशने यावेळी तन्वी कोलतेला चांगलंच झापलं. याशिवाय दीपाली सय्यदवरही रितेश चांगलाच भडकला होता. दीपालीशी संवाद साधताना तिने वापरलेला एक शब्द रितेशला चांगलाच खटकला. त्यामुळे रितेशने दीपालीला सुनावलं. काय घडलं नेमकं?
रितेश दीपालीवर भडकला, कारण...
'बिग बॉस मराठी ६'मध्ये भाऊचा धक्कावर रितेशने दीपालीची शाळा घेतली. मकरसंक्रांतीचा सण होता आणि दीपालीने तन्वी कोलतेशी भांडण केलं, या मुद्द्यावर रितेशने दीपालीला फटकारलं. तन्वी सगळं विसरुन दीपालीला मदत करायला आली होती. पण दीपालीने तिची मदत नाकारली. सणासुदीच्या दिवशी घरात उगाच वाद पेटल्याने रितेशने दीपालीला सुनावलं. त्यावेळी रितेशशी बोलताना दीपालीने त्याचा उल्लेख RD (रितेश देशमुखचा शॉर्ट फॉर्म) म्हणून केला. याशिवाय रितेश बोलत असताना दीपाली मध्येच बोलत होती.
त्यामुळे रितेशचा पारा चढला. तो दीपालीला म्हणाला, ''एक मिनिट मी बोलतोय. माझं नाव रितेश आहे. RD नाहीये.'' पुढे दीपालीने रितेशला 'भाऊ' म्हणून संबोधलं. ते ऐकताच रितेश म्हणाला, ''भाऊ पण म्हणू नका... रितेश म्हणा... नो प्रॉब्लेम...'' अशा शब्दात रितेशने दीपालीला फटकारलं. हे ऐकताच दीपाली शांत झाली. अशाप्रकारे दीपालीने RD म्हणून केलेला उल्लेख रितेशला आवडला नाही. दरम्यान आज 'बिग बॉस मराठी ६' मधून नॉमिनेट झालेल्या ९ पैकी एक सदस्य घराबाहेर जाण्याची शक्यता आहे.