"८ महिने ती आम्हाला भेटली नाही...", प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेत्रीचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:42 IST2025-09-05T11:40:28+5:302025-09-05T11:42:32+5:30
प्रियाची सहकलाकार आणि अगदी जवळची मैत्रीण असलेल्या राजश्री निकम यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

"८ महिने ती आम्हाला भेटली नाही...", प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेत्रीचे डोळे पाणावले
लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाचा सामना करत होती. पण तिच्या या आजाराबाबत फारसं कोणालाच माहीत नव्हतं. प्रिया एकटीच कर्करोगाशी झुंज देत होती. ३१ ऑगस्ट रोजी तिची ही झुंज संपली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांना आणि तिच्या जिवलग मैत्रिणींनाही फार मोठा धक्का बसला आहे. प्रियाची सहकलाकार आणि अगदी जवळची मैत्रीण असलेल्या राजश्री निकम यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.
राजश्री निकम म्हणाल्या, "आम्ही जेव्हा भेटत होतो तेव्हा असा एकही दिवस गेला नाही की आम्ही भेटलो आणि शंतनूला कॉल नाही केला. आम्ही प्रियाला हीच विनंती करायचो की एकदा आम्हाला भेट. तू मैत्रीण आहेस आमची... पण तिने कधीच स्वत:ची ब्लॅक साइट कोणालाच दाखवली नाही. आम्हालाही नाही... तिचं नेहमी असंच असायचं की प्रॉब्लेम आहे तर आपण त्यावर उपाय शोधुया...रडत नको बसुया. तिला मी म्हणायचे सुद्धा की तुच म्हणायचीस ना फुल ऑफ लाइफ...मग भेटू आपण, बोलू, काहीतरी मार्ग काढू. ती म्हणायची की मला नाही यायचं. यात ८ महिने गेले... ८ महिने ती पोरगी आम्हाला भेटली नाही. याचंच खूप दु:ख वाटतं. ८ महिने तिला आम्ही म्हणत होतो की भेटुया पण ती नाही भेटली".
"ती हिंदीतून आल्यामुळे तिच्याकडे प्रोफाशनॅलिझम होता. आमच्यात युनिटी होती याचं मुख्य कारण म्हणजे प्रिया. ती मला म्हणायची की हो किंवा नाही काहीतरी एकच असतं. याच्यामध्ये काहीच नसतं. तू कुणाच्या गुडबुक्समध्ये नाही राहू शकत. एकतर हो किंवा नाही", असंही त्या पुढे म्हणाल्या.