Video: राघव जुयाल बोलत असताना पहिल्याच रांगेतील माणूस घोरत होता; पुढे घडलं असं काही की, सर्वांची हसून पुरेवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:47 IST2025-10-09T14:44:21+5:302025-10-09T14:47:23+5:30
राघव जुयालचं लक्ष झोपलेल्या त्या माणसाकडे गेलं. त्याने चालू मुलाखत थांबवली. आणि मग पुढे... पाहा व्हिडीओ

Video: राघव जुयाल बोलत असताना पहिल्याच रांगेतील माणूस घोरत होता; पुढे घडलं असं काही की, सर्वांची हसून पुरेवाट
अभिनेता, डान्सर आणि सध्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजमुळे चर्चेत असलेला राघव जुयाल हा आपल्या बिनधास्त आणि 'नो-फिल्टर' स्वभावामुळे नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. नुकताच एका मुलाखतीदरम्यान राघवचा असाच एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे.
थेट स्टेजवरून उतरला राघव
राघव जुयालने नुकतंच YuvaaConclave2.0 मध्ये आपल्या करिअर आणि 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशाबद्दल संवाद साधला. या संवादादरम्यान, अचानक त्याचं लक्ष समोरच्या रांगेत बसलेल्या एका व्यक्तीकडे गेलं. तो व्यक्ती चक्क झोपून डुलक्या घेत होता. हा प्रकार पाहताच राघव क्षणभरही न थांबता स्टेजवरून खाली उतरला आणि थेट त्या झोपलेल्या व्यक्तीजवळ गेला. तिथे जाऊन त्याने आपला त्या व्यक्तीच्या समोर डायलॉग बोलून त्याला अचानक उठवलं.
हा अनपेक्षित क्षण खूप मजेशीर ठरला. अचानक जाग आल्याने तो व्यक्ती हसू लागला आणि त्यानंतर राघवने त्याला पाणी देऊन मिठी मारली. या संपूर्ण घटनेमुळे प्रेक्षक आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. या घटनेनंतर आपल्या कृतीचे समर्थन करताना राघवने अत्यंत मजेशीरपणे आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, "जोपर्यंत मला माझी गोष्ट जगभरात पोहोचवायची आहे, तोपर्यंत मी ती पोहोचवूनच राहणार, मग समोरचा माणूस झोपलेला असो वा... काहीही करत असो."
यानंतर मुलाखतकाराने राघवला पुन्हा प्रश्न विचारले. तेव्हा राघवने गमतीत म्हटलं की, "अरे, त्याला उठू तर द्या, तो ब्रश करेल, बाथरूमला जाईल... थोडा वेळ द्या यार... तो थोडा आळस देईल तो. थांबा", असं म्हणत राघवने माहोल पूर्ण हसताखेळता ठेवला. राघवचा हा 'नो-फिल्टर' अंदाज सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. अनेकांनी राघवच्या मनमौजी आणि दिलखुलास स्वभावाचं कौतुक केलं आहे.