तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ६ महिन्यांतच मालिका बंद, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'प्रेमाची गोष्ट'चा शेवटचा भाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:57 IST2025-07-04T11:56:49+5:302025-07-04T11:57:28+5:30
तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांतच मालिका बंद करण्याची वेळ आली आहे.

तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ६ महिन्यांतच मालिका बंद, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'प्रेमाची गोष्ट'चा शेवटचा भाग
'प्रेमाची गोष्ट' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेतील मुक्ता आणि सागर यांची लव्हस्टोरी आणि खलनायिका बनून त्यांच्या आयुष्यात मिठाचा खडा बनून आलेली सावनी प्रेक्षकांना भावली होती. सुरुवातीपासूनच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत होती. मात्र आता मालिका बंद होत आहे. तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांतच मालिका बंद करण्याची वेळ आली आहे.
सुरुवातीला 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्री प्रधान मुक्ताची भूमिका साकारत होती. तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली होती. मात्र जानेवारी महिन्यात अचानक तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. तेजश्रीने अचानक मालिका सोडल्याने चाहते नाराज होते. त्यानंतर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, आता मालिकेला निरोप घ्यावा लागत आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवटचा भाग येत्या शनिवारी म्हणजेच ५ जुलै रोजी दुपारी १ वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागात सावनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येत असल्याचं दाखवण्यात येणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिका लवकर निरोप घेत असल्याने चाहते थोडे नाराज आहेत.