दादा, एकटी पडलीये रे...परत ये ना! इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:16 IST2026-01-28T13:15:24+5:302026-01-28T13:16:14+5:30
आम्ही कुठे बघणार, काय करणार, कसं करणार रे आता...प्रतीक्षा कदमने भावासोबतचा शेवटचा फोटो शेअर केला.

दादा, एकटी पडलीये रे...परत ये ना! इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट
मराठीतला प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं दोन दिवसांपूर्वी अचानक निधन झालं. इतर इन्फ्लुएन्सर्सने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. प्रथमेशचे त्याच्या आईसोबतचे रील्स लोकप्रिय होते. कोरोनामध्ये वडिलांचं निधन झाल्यावर त्याने आईला धीर दिला होता. तिच्यासाठीच तो इन्फ्लुएन्सर बनला. तिला आनंद देण्याचा प्रयत्न केला. प्रथमेशला एक बहीणही आहे. भावाच्या निधनानंतर प्रतीक्षा कदमने पहिली पोस्ट केली आहे.
प्रथमेश कदमच्या निधनानंतर त्याची बहीण आता एकटी पडली आहे. आधी वडील गेले, आता भाऊ गेला. तिच्यावरच आईची जबाबदारी आली आहे. प्रतिक्षा कदमने काल इन्स्टाग्राम स्टोरीवर भावासोबतचा शेवटचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांची आईही आहे. हा दिवाळीचा फोटो आहे ज्यात तिघेही छान नटले आहेत. प्रतीक्षा लिहिते, 'मिस यू दादा..शेवटचा फॅमिली फोटो.'
याशिवाय प्रतीक्षाने आणखी काही स्टोरी पोस्ट केल्या होत्या ज्या आता तिने डिलीट केल्या आहेत. तिने लिहिलेले, "दादा काय केलं रे तू कळतंय का तुला, आई आणि मला सोडून गेलास. आम्ही कुठे बघणार, काय करणार, कसं करणार रे आता...". तिने पुढे लिहिले, "दादा ये ना रे प्लीज, मी एकटी पडले रे. तुझी खूप जास्त आठवण येत आहे. तू ये, हे मी सहन नाही करू शकत की तू सोडून गेलास. ये ना, माझ्या आणि आपल्या मम्मीसाठी तरी... नाही का? हे वय चुकीचं आहे तुझं जायचं. आपल्याला सर्व स्वप्न पूर्ण करायची होती ना, मग का असं केलंस? मला एकटीला टाकून गेलास. आता कोणाला मी भाऊबीज, रक्षाबंधन करणार हक्काने? दादा प्लीज परत ये ना...""

प्रथमेशला नक्की काय झालं होतं?
प्रथमेश काही दिवसांपासून रुग्णालयातच दाखल होता. रुग्णालयातही तो आई आणि मित्रांसोबत रील पोस्ट करत होता. मात्र त्याचं आजारपण जास्तच वाढलं. प्रथमेशचा मित्र आणि इन्फ्लुएन्सर तन्मय पाटेकरने सांगितले की, 'प्रथमेश टायफॉइड आणि रक्तामधील कावीळ या आजाराने त्रस्त होता. डॉक्टरांनी उपचार केले मात्र त्यांना यश आलं नाही. शेवटी आपल्या हातात काही नसतं कारण 'जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला' असं म्हणतात ते खरं आहे."