प्रथमेश-मुग्धाच्या घरी लग्नाची लगबग! हळदीचे सुंदर Photos आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 12:04 IST2023-12-20T11:48:33+5:302023-12-20T12:04:06+5:30
प्रथमेश-मुग्धाच्या हळदीचे फोटो पाहिले का?

प्रथमेश-मुग्धाच्या घरी लग्नाची लगबग! हळदीचे सुंदर Photos आले समोर
मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. प्रसाद-अमृता, पियुष-सुरुची नंतर आता आणखी एका कपलची लग्नाची लगबग सुरु झाली आहे. ते कपल म्हणजे 'सा रे ग म प लिटिल चॅम्प' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन (Prathamesh Laghate-Mugdha Vaishampayan). कालच दोघांनी व्याही भोजनाचे फोटो शेअर केले होते. तर आता मुग्धा-प्रथमेश हळदीच्या रंगात न्हाऊन गेले आहेत. त्यांचे हळदी समारंभाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'सा रे ग म प लिटिल चॅम्प' फेम मोदक आणि मॉनिटर म्हणजेच प्रथमेश आणि मुग्धाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. हे कळताच चाहत्यांना सुखद धक्काच बसला. ही सुरेल जोडी एकत्र येत असल्याने चाहत्यांना खूपच आनंद झाला. नुकतीच दोघांची हळद पार पडली असून याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने हा हळद समारंभ झालेला दिसतोय. मुंडावळ्या बांधून मुग्धा हळदीसाठी बसलेली आहे. तिच्या चेहऱ्याला आणि हाताला हळद लावलेली दिसतेय. सोबतच लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. तर दुसरीकडे प्रथमेशचेही हळदीचे फोटो अतिशय अप्रतिम आहेत. 'हरिद्रा लापन' असं कॅप्शन त्यांनी दिलेलं आहे.
मुग्धाची बहीण मृदुल वैशंपायन काहीच दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. तर आता मुग्धाही लग्न करुन सासरी जाण्यासाठी तयार आहे. प्रथमेश आणि मुग्धाची भेट अगदी लहान वयातच सारेगमप शोमध्ये झाली. दोघांच्याही गाण्याचा जॉनर एक असल्याने नंतर त्यांनी एकत्र शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले. तेव्हाच दोघांचे सूर जुळले. मुग्धा प्रथमेशला आता वधू आणि वराच्या रुपात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.