'पिंगा गं पोरी पिंगा': जळगावची वल्लरी, मुंबईची कॉर्पोरेट स्त्री बनण्यास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:48 IST2024-12-26T12:47:43+5:302024-12-26T12:48:01+5:30

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेतील वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे(Aishwarya Shete)ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वल्लरीचा गावाकडचा लूक, भाषा, देहबोली सर्वकाही लक्षवेधी आहे. अशातच आता वल्लरी एका नव्या लूकमध्ये झळकणार आहे.

'Pinga Ga Pori Pinga': Valari from Jalgaon, ready to become a corporate woman of Mumbai | 'पिंगा गं पोरी पिंगा': जळगावची वल्लरी, मुंबईची कॉर्पोरेट स्त्री बनण्यास सज्ज

'पिंगा गं पोरी पिंगा': जळगावची वल्लरी, मुंबईची कॉर्पोरेट स्त्री बनण्यास सज्ज

'कलर्स मराठी'वरील 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) ही मालिका एक नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे(Aishwarya Shete)ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वल्लरीचा गावाकडचा लूक, भाषा, देहबोली सर्वकाही लक्षवेधी आहे. अशातच आता वल्लरी एका नव्या लूकमध्ये झळकणार आहे. गावाकडच्या वल्लरीचा शहरी बाज असलेला कॉर्पोरेट लूक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. वल्लरीने कॉर्पेरेट लूकवर सौभाग्याचं लेणं लावल्याने तिला हिणवलं जातंय. वल्लरी शहरात राहत असली तरी गावच्या मातीशी तिची नाळ जोडलेली आहे. आता येणाऱ्या आव्हानाचा वल्लरी कशी सामना करणार, कसा समजाचा दृष्टिकोन बदलणार हे पाहावे लागेल.

'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेतील आपल्या नव्या लूकबद्दल बोलताना वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणाली,"एक व्यक्तीरेखा उभं करताना महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या पात्राचा लूक, त्याची भाषा, देहबोली. 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत एकाच पात्राच्या दोन वेगळ्या छटा  साकारण्याची संधी मला मिळाली आहे. कॉर्पोरेट लूकमध्ये वावरताना एक वेगळच बळ अंगात संचारलं आहे. कॉर्पोरेटचा रुबाब आणि त्याच्यासोबत गावाकडेचा साधेपणा अशा अनेक गोष्टींचा टच या नव्या लूकला आहे. ऐश्वर्यापेक्षा पूर्णपणे वेगळं पात्र या मालिकेत मी साकारत आहे". 

वल्लरीचा कॉर्पोरेट लूक घेणार लक्ष वेधून

आपल्या पात्राबद्दल आणि वल्लरीच्या मूळ लूकबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली,"सुरुवातीला वल्लरी या पात्राबद्दल मी खूप संभ्रमात होते. पण, माझा हा लूक आणि तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मस्सा, गोंदन या गोष्टी पाहून गावाकडच्या मुलीचं पात्र साकारणं आणि तिकडची दिसणं हे कितपत लोकांना पटणार आहे? आणि कसं दिसणार आहे.. असे अनेक प्रश्न पडले होते. पण या लूकने सर्वांचच लक्ष वेधून घेतलंय. तसेच खानदेशी भाषा शिकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. सहनशील, समजूतदार असे वल्लरीचे अनेक गुण शिकण्यासारखे आहेत. खरं सांगायचं तर या मालिकेला एका क्षणात मी होकार दिला होता. कारण खरचं हा पाच मुलींचा पिंगा आहे. पाच वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या मुली, त्यांची स्वप्न.. पण या सगळ्यात वल्लरी एक वेगळी स्टँड आऊट होते. मला खात्री आहे की, आतापर्यंतच्या माझ्या पात्रावर प्रेक्षकांनी जेवढं प्रेम केलंय तेवढचं प्रेम त्यांनी वल्लरीवरदेखील करावं आणि तिला आपलंसं करावं". वल्लरीचा गावरान बाज असणाऱ्या लूकप्रमाणे तिचा कॉर्पोरेट लूकदेखील मालिकाप्रेमींचं लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. 

Web Title: 'Pinga Ga Pori Pinga': Valari from Jalgaon, ready to become a corporate woman of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.