इतिहासात पहिल्यांदाच, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ टेलिव्हिजनच्या स्क्रिनवर एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:33 IST2025-11-07T12:31:53+5:302025-11-07T12:33:40+5:30
मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी! अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही सुपरहिट जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर

इतिहासात पहिल्यांदाच, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ टेलिव्हिजनच्या स्क्रिनवर एकत्र
Nivedita Saraf In Ashok Mama Marathi Serial: मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लाडकी आणि सुपरहिट जोडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ. पडद्यावरील त्यांची जुगलबंदी आणि केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्यांनी अनेक चित्रपटांमधून एकत्र काम केले आहे. या जोडीच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता ही जादूई जोडी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच मालिकेत एकत्र दिसणार आहे. अशोक सराफ यांच्या सध्या सुरू असलेल्या लोकप्रिय 'अशोक मा. मा.' या मालिकेत निवेदिता सराफ यांची लवकरच एन्ट्री होणार आहे.
'अशोक मा. मा.'या मालिकेत निवेदिता सराफ यांची भूमिका एका उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची आहे, जी स्वतःचा 'संस्कार वर्ग' चालवते. निवेदिता यांचा हा संस्कार वर्ग पारंपारिक चौकटीत बसलेला नाही. तो दया, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला आहे. त्या मुलांना कथा, कला आणि हास्याच्या माध्यमातून महत्त्वाचे जीवनमूल्यं शिकवतात.
जेव्हा अशोक मामा हे आपली नातवंड इरा आणि इशानला या वर्गात घेऊन येतात, तेव्हा त्यांना एका शिस्तप्रिय, पारंपरिक शिक्षिकेची अपेक्षा असते. पण समोर येते एक वेगळीच, आधुनिक विचारांची, पण मुळाशी जोडलेली स्त्री. तिच्या मोकळ्या आणि हटके शिकवण्याच्या पद्धतीमुळे मामांंचे ठाम विचार हादरतात. आता या दोघांना एकत्र मालिकेत पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच पती अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याबद्दल निवेदिता सराफ यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "मला खूप दिवसांपासून प्रेक्षक विचारत होते, तुम्ही आणि अशोक सराफ एकत्र कधी काम करणार आहात. बऱ्याच दिवसांपासून माझी देखील त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला खरंच खूप आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला. माझे सर्वात आनंदाचे दिवस असतात, जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करते. खूप काही शिकायला मिळतं". निवेदिता सराफ यांनी खात्री व्यक्त केली आहे की, ही जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर येत असल्यामुळे प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल.