'करायला गेले पुरणपोळी अन् झाली भाकरी'; वंदना गुप्तेंनी सांगितला फसलेल्या पदार्थाचा भन्नाट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 18:07 IST2021-12-16T18:06:45+5:302021-12-16T18:07:20+5:30
Vandan gupte: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यात वंदना गुप्ते, श्रेया बुगडे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांचा फसलेल्या पदार्थांचा किस्सा सांगितला आहे.

'करायला गेले पुरणपोळी अन् झाली भाकरी'; वंदना गुप्तेंनी सांगितला फसलेल्या पदार्थाचा भन्नाट अनुभव
छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत येत असलेला कार्यक्रम म्हणजे 'मस्त मजेदार किचन कल्लाकार'. आतापर्यंत आपण प्रत्येक कलाकाराला रुपेरी पडद्यावर अभिनय करतांना पाहिलं आहे. यात अनेकदा हे कलाकार रिल लाइफमध्ये स्वयंपाक घरात छान चमचमीत स्वयंपाक करतांनाही दिसून आले. मात्र, 'किचन कल्लाकार' या शोमध्ये हेच कलाकार रिअल लाइफमध्ये स्वयंपाक करणार आहेत. अलिकडेच हा शो सुरु झाला असून यात सेलिब्रिटी स्वत:च्या हाताने काही पदार्थ प्रेक्षकांना तयार करुन दाखवणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत असून काही कलाकार त्यांच्या फसलेल्या पदार्थांची गंमत सांगत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यात वंदना गुप्ते, श्रेया बुगडे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांचा फसलेल्या पदार्थांचा किस्सा सांगितला आहे. मात्र, या सगळ्यात वंदना गुप्ते यांच्या अनुभवाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
"माझ्या सासूबाई उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या आणि पुरणपोळी तर सुंदरच करायच्या. तर एकदा मी आमचं नवीन घर त्यांना पाहायला बोलावलं. आणि, मी पुरणपोळी करायला घेतली. पण, किती फसली माझी पोळी. ज्यावेळी सगळे जेवायला बसले तेव्हा म्हणाले, आज मी पुरणाच्या भाकऱ्या केल्यात बरं का.. खरं तर पुरणाची पोळी फसलीये हे सगळ्यांच्या लक्षात आलं. पण, सासऱ्यांनी कौतुकाने ती खाल्ली. पुरण वगैरे छान झालेलं. फक्त पोळीच्या जागी भाकरी झाली होती", असं वंदना गुप्ते म्हणाल्या.
दरम्यान, वंदना गुप्ते यांनी फसलेल्या पदार्थाची ही गोड आठवण शेअर केली आहे. त्यांचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. त्यांच्याप्रमाणेच श्रेया बुगडेनेही तिच्या फसलेल्या मोदकांचा अनुभव या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.