आई गोंधळाला ये! गौतमी पाटीलचं नवरात्रीनिमित्त गाणं प्रदर्शित, तुळजाभवानी चरणी घातलं साकडं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:35 IST2025-09-23T10:31:14+5:302025-09-23T10:35:02+5:30
गौतमीचं 'आई गोंधळाला ये' हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

आई गोंधळाला ये! गौतमी पाटीलचं नवरात्रीनिमित्त गाणं प्रदर्शित, तुळजाभवानी चरणी घातलं साकडं
Gautami Patil Navratri Special Song Video: महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या नृत्याने आणि अदांनी तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील असा एक जिल्हा नसेल जिथे गौतमीचा चाहता नसेल. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता नवरात्रीनिमित्त ती एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गौतमीचं 'आई गोंधळाला ये' हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. तिच्या या नव्या गाण्यावर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
गौतमी या गाण्यात देवीचा गोंधळ घालतेय. गौतमीने हिरवी साडी नेसली असून, पारंपरिक दागिने आणि कपाळावर भरलेला मळवट तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. या पारंपरिक वेशभूषेत ती अत्यंत सुंदर दिसत असून, तिच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव लक्ष वेधून घेतो. गौतमी मनोभावे आई तुळजाभवानीला साकडं घालताना दिसते. गाण्यातील तिचा हा लूक आणि तिचा डान्स चाहत्यांना खूपच आवडला आहे.
'आई गोंधळाला ये' हे गाणं 'सारेगामा मराठी' या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं असून, संगीत चंदन कांबळे यांनी दिलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे गाणं देवीच्या गोंधळ परंपरेची खरी ओळख करून देणार आहे.
दरम्यान, गौतमी पाटील आता अभिनेत्री झालीये. तिनं स्टार प्रवाहवर 'शिट्टी वाजली रे' या स्वयंपाकाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यामध्ये देखील तिने परफॉर्मन्स केला होता. याव्यतिरिक्त, ती 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाचा एक भाग होती, ज्यात ती स्टार प्रवाह परिवारासोबत दिसली होती. अलिकडेच ती प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) च्या 'आतली बातमी फुटली' या (Aatli Baatmi Futlii Marathi Movie) चित्रपटातील 'सखूबाई' गाण्यात झळकली. आता मोठ्या पडद्यावर मुख्य भुमिकेत तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.