"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:24 IST2026-03-25T17:24:00+5:302026-03-25T17:24:31+5:30
मिलिंद गवळींच्या साखरपुड्याला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांनी साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी साखरपुड्यात घडलेला एक मजेशीर किस्साही सांगितला आहे.

"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असलेले मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. वैयक्तिक आणि करिअरचे अपडेट्स ते चाहत्यांना देत असतात. मिलिंद गवळींचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. नुकतंच मिलिंद गवळींच्या साखरपुड्याला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांनी साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी साखरपुड्यात घडलेला एक मजेशीर किस्साही सांगितला आहे.
मिलिंद गवळींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की "आज ३६ वर्ष पूर्ण झाली... बरोबर आजच्या दिवशी ३६ वर्षापूर्वी माझा आणि दिपाचा साखरपुडा धुळ्यामध्ये, गरुड बागेत, लक्ष्मी निवास या दिपाच्या घराच्या अंगणात पार पडला. २५ मार्च १९९० , त्यावेळेला मी AIR वर transmission executiveची नोकरी करत होतो. २ दिवसाची सुट्टी काढून मी माझ्या कुटुंबाबरोबर आधी नाशिकला गेलो. माझ्या आजी आजोबा, आणि २०-२५ इतर नातेवाईक यांच्याबरोबर दोन-तीन गाड्या, एक छोटी बस घेऊन धुळ्याला पोहोचलो. ठरल्याप्रमाणे साखरपुड्याचा, सुपारी फोडायचा कार्यक्रम झाला. मग जेवणाच्या पंगती बसल्या, मी उत्सव मूर्ती होतो त्यामुळे, माझं ताट छान सजवून रांगोळी काढून मला वाढलं होतं. खूप जण आग्रह करून वाढत होते, त्यात एक त्यांच्यातला लांबचा नातेवाईक माझ्याकडे गुलाबजाम घेऊन आला आणि मला भरवायला लागला. मी त्याला नम्रपणे सांगितलं की मला फार गोड आवडत नाही, मग तर त्याचा आग्रह जास्तीच वाढला. मी पण नाही, नाहीच म्हणत होतो, तो काही थांबायला तयार नव्हता, "तुम्ही मुंबईची मंडळी जरा नाजूकच असतात," असं म्हणाला , मग मला म्हणाला " अहो दाजी, तुम्ही एक गुलाबजाम खा, मी दोन खाईन, तुम्ही दोन खाल्ले तर मी चार, तुम्ही जितके खाल त्याच्या दुप्पट मी खाईन".
"मी म्हटलं तू दुप्पट खाणार असशील तर मग मी खातो. गुलाबजामचं पातेलच मी मागून घेतलं, मी एक खाल्ला, त्या गृहस्थाने दोन खाल्ले, मग मी दोन खाल्ले, त्यांनी चार खाल्ले. एका मागे एक माझे बारा झाले. त्याने २४ खाल्ल्यानंतर मात्र, तो भंजाळून गेला होता. त्याच्या घशापर्यंत आलं होतं, मग तो गृहस्थ म्हणाला, "दाजी मला बस झालं आता", माझ्या ऐवजी दुसरा कोणीतरी खाईल. मी पण हट्टाला पेटलो होतो, म्हटलं नाही आता मी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तू दुप्पट खात राहायचे. तितक्यात वडीलधारी मंडळी आली आणि हे सगळं तिथेच थांबलं. या ३६ वर्षांमध्ये त्या गृहस्थाला भेटायची माझी खूप इच्छा होती. पण त्याची आणि माझी पुन्हा भेट कधीच झाली नाही. तो नक्कीच म्हणाला असेल हा दाजी, म्हणजे दिपाचा होणारा नवरा, नक्कीच सटकीला आहे. दिपा एकवीस बावीस वर्षाची, मी २२-२३ वर्षांचा... खरं तर आम्ही दोघेही अल्लडच होतो, आई-वडिलांचा आम्हाला खूपच support, ती तरी फार लवकर matured झाली, मी मात्र अजूनही immature चं राहिलो. माझ्या संसाराचा गाडा इतकी वर्ष सुरळीत चालला त्याचं कारण, दिपाची maturity, समजूतदारपणा, काटकसरीपणा, घरासाठी संसारासाठीचे, आमच्या लेकीसाठी अविरत कष्ट, आणि आमच्या आई-वडिलांचे, सासूचे, आमच्या बहिण भावांचे, मित्रमंडळी, शुभचिंतकांचे, भरभरून आशीर्वाद, भरभरून शुभेच्छा, ज्या मला आयुष्यभर पुरतील इतक्या", असं म्हणत त्यांनी मजेशीर किस्सा सांगितला आहे.