"मालिका बंद करा...", नवरा-बायकोचा इतका हिंसक सीन की प्रेक्षकांचा पाराच चढला, मराठी सिरीयल होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:29 IST2025-12-16T12:28:38+5:302025-12-16T12:29:08+5:30
'मी संसार माझा रेखिते' मालिकेचा हा सीन फारच हिंसक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. हा सीन पाहून प्रेक्षक चिडले आहेत. या प्रोमोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

"मालिका बंद करा...", नवरा-बायकोचा इतका हिंसक सीन की प्रेक्षकांचा पाराच चढला, मराठी सिरीयल होतेय ट्रोल
मराठी मालिकांचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. प्रेक्षक आवडीने मालिका पाहतात आणि त्याबद्दल व्यक्तही होतात. आवडत्या मालिकेवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. पण, सध्या मात्र एका मालिकेमुळे प्रेक्षकांना संताप अनावर झाला आहे. मालिकेतील हिंसक सीनवर प्रेक्षक आणि चाहत्या वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय मालिका बंद करण्याची मागणीही होत आहे.
सन मराठी वाहिनीवर 'मी संसार माझा रेखिते' ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अविनाश अनुप्रियाला बासुंदी प्यायला भाग पाडतो. श्रीकांतने बनवलेल्या बासुंदीचं अनुप्रिया कौतुक करते आणि ती बासुंदी पिते. याचा राग डोक्यात ठेवत अविनाश अनुप्रियाला बासुंदीने भरलेलं पातेलं प्यायला सांगतो. "परपुरुषाचं कौतुक करणं ही चूक तुझ्या हातून घडली. खूप बासुंदी आवडते ना तुला", असं म्हणत तो बासुंदीचं पातेलं अनुप्रियाच्या तोंडाला लावतो आणि जबरदस्तीने तिला बासुंदी पिण्यास भाग पाडतो, असं प्रोमोमध्ये दिसत आहे.
'मी संसार माझा रेखिते' मालिकेचा हा सीन फारच हिंसक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. हा सीन पाहून प्रेक्षक चिडले आहेत. या प्रोमोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. "ही मालिका बंद करा. हे दाखवून काय सिद्ध करायचं आहे की संसार वाचवण्यासाठी किती पण त्रास स्त्रीने सहन करावा?", अशी कमेंट करत चाहत्याने नाराजी व्यक्त केली आहे.

"बंद करा ही मालिका.... किती negativity दाखवताय आजच्या काळात....इतकंही कोणी सहन करत नाही एकतर दाखवायचंय तर positive दाखवा नाहीतर बंद करा मालिका", अशी कमेंटही केली आहे.

'मी संसार माझा रेखिते' मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर अनुप्रिया तर हरिष दुधाडे अविनाश ही भूमिका साकारत आहे. याशिवाय मालिकेत वैभव केळकर, हेमंत पाटील, दिनेश कोयंडे, अमित छल्लारे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.