मालिकेच्या सेटवर जुळले सूत; 'अहो' म्हणून हाक मारली अन्...; 'लग्नानंतर होईलच...' मधील पार्थ देशमुखची हटके लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:48 IST2025-10-29T11:45:28+5:302025-10-29T11:48:34+5:30
'लग्नानंतर होईलच प्रेम...' मधील पार्थ देशमुखची हटके प्रेमकहाणी

मालिकेच्या सेटवर जुळले सूत; 'अहो' म्हणून हाक मारली अन्...; 'लग्नानंतर होईलच...' मधील पार्थ देशमुखची हटके लव्हस्टोरी
Vijay Aandalakar Lovestory: अभिनेता विजय आंदळकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेमुळे अभिनेता घराघरात पोहोचला. सध्या विजय स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मुख्य भूमिका साकारतो आहे. या मालिकेत त्याने साकारलेला शांत, शिस्तप्रिय पार्थ देशमुख अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या विजय आंदळकर एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने लग्नाचा मजेशीर किस्सा शेअर केला.
अलिकडेच विजय आंदळकरने सपत्नीक 'Fun Banter' ला मुलाखत दिली. विजय आंदळकरच्या बायकोचं नाव रुपाली झंकार-आंदळकर असं आहे.‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ याच मालिकेत रुपाली विजयच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर त्यांचं नातं बहरलं. विजय आणि रुपालीला एक मुलगी आहे; जिचं मायरा नाव आहे.दरम्यान, या मुलाखतीत त्यांचं लग्न कसं झालं याबद्दल विजयने सांगितलं आहे. तो किस्सा सांगताना अभिनेत्याची पत्नी म्हणाली,आम्ही एकत्र मालिकेत काम करत असताना तो मला आवडायला लागला. वर्तुळ मालिकेतील त्याचं काम मला आवडत होतं. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. खरं, सांगायचं तर आमच्या दोघांच्या वयामध्ये १२ वर्षांचं अंतर आहे. पण त्याचं आम्हाला काहीच वाटत नाही."
अशी झाली लव्हस्टोरीला सुरुवात
त्यानंतर रुपाली म्हणाली, "मालिकेत आम्ही एकत्र काम करताना तो मला आवडायचा, हे खरं आहे. तेव्हा मालिकेचं शूट संपलं होतं आणि आम्हाला ३ दिवसांची सुटी होती. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या घरी गेला होता. त्याआधी एकमेकांकडे बघतही नव्हतो. मी आधी त्याला अरेतुरे करायचे. त्यानंतर मग मी सेटवर मालिकेतील नावाप्रमाणे प्रत्येकाला आवाज द्यायचे. तेव्हा मी यांना अहो म्हणून हाक मारली होती. त्यावेळी त्यांनी जो लूक दिला ते पाहून मला छान वाटलं.मग आम्ही बोलायला लागलो आणि मग हळूहळू गोष्टी पुढे गेल्या." पुढे विजयने मालिकेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा सांगत म्हणाला, त्या मालिकेच्या सेटवरचे निर्माते हिचे काका होते, ही त्यांची पुतणी होती. तेव्हा ते मला म्हणाले, बघा जरा लांब राहा.ती तुमच्या प्रेमात आहे.
लग्नाच्या दिवसाचा किस्सा सांगताना विजय म्हणाला," लग्नाचा तर गोंधळ आहे.लॉकडाउन लागणार होतं २२ तारखेला. २१ ला आमची हळद आणि साखरपुडा होता मग २२ ला लग्न होतं. २० तारखेला रात्री कळलं हे. मी हिला सांगत होतो नाही परमिशन मिळणार, नाही मिळणार, मी माझ्या आयपीएस मित्राला फोन केला. तोसुद्धा म्हणाला नाही मिळणार परमिशन. पण तरीही तिने धावपळ केली. पण नाहीच मिळाली परमिशन. मग शेवटी २० तारखेला रात्री ९-१० वाजता हे लोक त्यांच्या घराच्या बाहेर मंडप टाकण्यासाठी मंडपवाले शोधायला लागले. जे आले रात्री २ वाजता. एका बाजूला हळदीचा स्टेज बांधला आणि दुसरीकडे लग्नाचा. आम्ही सकाळी ९ ला त्यांच्याकडे पोहोचलो.लग्न झालं, विधी झाल्या आणि आम्ही कट टू पुणे. १२ च्या आत पोहोचायचं होतं पुण्याला. मग हिला गाडीत बसवलं आणि आम्ही आलो."
वर्कफ्रंट
विजय आंदळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.'वर्तुळ', 'पिंकीचा विजय असो' या मालिका तसंच
'मी अॅंड मिसेस सदाचारी', 'ढोल-ताशे', '७०२ दिक्षित' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.