"आनंद कमी अन् तणाव...", TV मालिकांमध्ये काम करण्याच्या पद्धतीबद्दल अमृता देशमुखचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:46 IST2025-09-08T15:35:49+5:302025-09-08T15:46:33+5:30
"आनंद कमी अन् तणाव जास्त...", TV मालिकांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी

"आनंद कमी अन् तणाव...", TV मालिकांमध्ये काम करण्याच्या पद्धतीबद्दल अमृता देशमुखचा मोठा खुलासा
Amruta Deshmukh: छोटा पडदा हे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन आहे.या मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. महिलावर्ग तर अगदी यामध्ये एकरूप होऊन जातात. दरम्यान, जितकं प्रेम या मालिकांना मिळतं तितकंच भरभरून प्रेम प्रेक्षक कलाकारांना देतात. मात्र, या पडद्यामागचं वास्तव फार भीषण असतं. अनेकदा कलाकारांना काम करताना चांगल्या वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. अशातच मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने मालिका क्षेत्राच्या बदलत्या स्वरुपावर स्पष्टपणे तिचं मत व्यक्त केलं आहे.
नुकतीच अमृता देशमुखने 'सर्व काही' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अमृताला प्रश्न विचारण्यात आला की, "तू नाटक व मालिकांमध्येदेखील काम करतेस. तर नाटक, मालिका, सिनेमा यांच्यात नेमका काय फरक आहे?
मला असं वाटतं की, मालिकांमध्ये एका पॉइंटनंतर खूप मेकॅनिकल पद्धतीने काम होतं. म्हणजे प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर असतं. दिग्दर्शक, निर्माते तसेच चॅनेलवर देखील प्रेशर असतं. पण, यातून असं होतंय की मालिकांचं वातावरण हे आनंद देणारं कमी आणि तणाव देणारं जास्त झालं आहे."
त्यानंतर पुढे अमृता म्हणाली,"दिग्दर्शकाचं असं होतं की, त्यांनी एका दिवसात २२ सीन लावलेत. ते कसं पूर्ण करणार आहे? ड्रेसवाल्यांचं असं होतं की, तुम्ही आज सकाळी सांगताय की, आज आपण प्रोमो शूट करणार आहोत आणि तुम्हाला काही फेस्टिव्ह लूक पाहिजे. तर, मी कसं मॅनेज करू? कलाकारांना असं होतं की, तुम्ही मला शिफ्ट वाढणार आहे, हे अगोदर सांगितलं नाही. मी काही वेगळे प्लॅन केले होते. निर्माता म्हणतो की मी काय करू, मला चॅनेलनं सांगितलं आहे. चॅनेल म्हणतं की, आपण हे करायलाच पाहिजे.त्याच्याशिवाय कसं होणार कारण की त्यांना कळलेलं असतं की,दुसऱ्या चॅनेलमध्ये एक महाएपिसोड येतोय.आपण काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर मग आपण मागे पडू. तर, या सगळ्यात कलाकार एक छोटं प्यादं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की, फार कमी वेळा खूप आनंद मिळतो. शेवटी माणसं त्या त्या दिवसातून आनंद शोधून काढतात. कोणी १०० टक्के दुःखी राहू शकत नाही; पण कुठेतरी हे बदलायला पाहिजे. शेवटी आपण कलेच्या क्षेत्रात आहोत. इतकं रोबोटिक का होत चाललेलं आहे?" असा खुलासा अभिनेत्रीने केला.
अलिकडेच अमृता देशमुख 'लक्ष्मी निवास' मालिकेत पाहायला मिळाली. 'फ्रेशर्स', 'तुमचं आमचं सेम असतं', 'मी तुझीत रे' अशा मालिकांमध्ये ती दिसली. त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी'मध्येही सहभागी झाली होती.