"पाच वेळा रिजेक्ट झाले नंतर...", शर्मिष्ठा राऊतने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली-"त्याच मालिकेसाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:23 IST2025-07-22T16:17:39+5:302025-07-22T16:23:16+5:30
शर्मिष्ठा राऊतने सांगितला 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेच्या कास्टिंंगचा किस्सा, म्हणाली...

"पाच वेळा रिजेक्ट झाले नंतर...", शर्मिष्ठा राऊतने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली-"त्याच मालिकेसाठी..."
Sharmishtha Raut : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut). 'मन उधाण वाऱ्याचे','जुळून येती रेशीम गाठी', 'कुंपण', 'सप्तपदी', 'चार दिवस सासूचे', 'अभिलाषा', 'एक झुंज वादळाशी' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. अलिकडेच शर्मिष्ठा राऊत 'अबोली' मालिकेत दिसली. अभिनयासह निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्री सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिष्ठा राऊतने एकंदरीत तिचा अभिनय प्रवास आणि संघर्ष काळातील आठवणी सांगितल्या.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने 'लोकशाही फ्रेंडली'सोबत संवाद साधला. शिवाय अनेक चांगले-वाईट अनुभव शेअर केले, 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेने अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. त्यादरम्यान शर्मिष्ठाने या मालिकेच्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला. त्याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, "मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत मला काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मला आठवतंय त्यांना निगेटिव्ह लीडच्या रिप्लेसमेंन्टसाठी कॅरेक्टरची गरज होती. त्यावेळी मला अभिजीत केळकरने सांगितलं होतं की, 'तू तिकडे जा आणि ऑडिशन दे'. मी त्याला म्हटलंही अरे! या मालिकेतील छोट्या छोट्या भूमिकांसाठी ऑडिशन देऊन मी पाच वेळा रिजेक्ट झाले. त्याने खूप पाठपुरावा केला आणि तो तिकडे माझ्या ऑडिशनसाठी बोलला."
अशी मिळाली भूमिका...
त्यानंतर अभिनेत्रीने सांगितलं, "त्याचंं बोलणं ऐकून मी तिथे ऑडिशन द्यायला गेले. माझा नंबर १६९ होता, निगेटिव्ह रोल आणि रिप्लेसमेंटसाठी तिथे खूप मुली ऑडिशनसाठी आल्या होत्या. तिथे माझा नंबर शेवटचा नंबर होता. मग मी ऑडिशन दिल्यानंतर पहिल्या लूकनंतर दुसऱ्यांदा लूक टेस्ट घेतली. त्यावेळी तिथे असलेल्या हेअर ड्रेसरही मला म्हणाल्या होत्या की दुसऱ्यांदा लूक टेस्ट घेतली म्हणजे तुझी निवड झाली असावी. याच मालिकेसाठी पहिले पाचवेळा ऑडिशन दिल्यानंतर रिजेक्ट झाले होते. त्यामुळे मला निगेटिव्ह रोल मिळेल असं वाटत नव्हतं. पण, मला तिथे महेश कोठारे सर भेटले. 'मन उधाण' वाऱ्याचे मालिकेचे ते निर्माते होते. त्यांना माझं काम आवडलं आणि ती भूमिका मला मिळाली." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.