नियतीचा खेळ! अकॅडमीमध्ये पहिली,रिझल्ट घेऊन घरी आली अन् वडिलांचं निधन, 'कमळी' फेम अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 14:08 IST2025-12-22T14:06:40+5:302025-12-22T14:08:24+5:30
'कमळी' फेम अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग, म्हणाली...

नियतीचा खेळ! अकॅडमीमध्ये पहिली,रिझल्ट घेऊन घरी आली अन् वडिलांचं निधन, 'कमळी' फेम अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग
Marathi Actress: ‘कमळी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेत अभिनेत्री विजय बाबर आणि निखिल दामले यांची प्रमुख भूमिका आहे.या मालिकेतील आणखी एका भूमिकेने लक्ष वेधले आणि ती म्हणजे कमळीच्या आईचे पात्र. मालिकेत ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री योगिनी चौक साकारते आहे. सध्या योगिनी चौक एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री योगिनी चौकने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं.'महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमुळे ती प्रचंड चर्चेत आली. सध्या 'कमळी' मालिकेत ही नायिका काम करताना दिसत आहे. याचदरम्यान, नुकतीच तिने 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास तसेच अनुभव सांगितला. ती म्हणाली, "आपल्या आयुष्यात अनेक टप्पे असतात.मी शाळेत असतानाच ठरवलं होतं की आपण कलाक्षेत्रातच काहीतरी करायचं आहे. डान्समध्ये आवड होती त्यामुळे ठरवलेलं की या क्षेत्रात यायचं. अॅक्टिंगचा काही गंध नव्हता. दहावी झाल्यानंतर तेव्हा आपण नर्तिका व्हावं असं ठरवंलं. मी भरतनाट्यम डान्सर आहे. त्यामुळे मला विश्वास होता की मी नर्तिका म्हणून जास्त उभारेन. तेव्हा नालंदा विद्यापिठाने माझा प्रवेश नाकारला. तेव्हा माझ्या बाबांनी मला रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घे, असं सांगितलं. तिथे कल्चरल अॅक्टिव्हिटीज सतत असायच्या. त्यावेळी तिथे संस्कृत नाटकाच्या ऑडिशनची जाहिरात आली होती. मुळात आमच्याक़डे आई-बाबांनीच असे संस्कार लावले होते की, संध्याकाळी घरी आल्यानंतर शुभंकरोती म्हणणं. आमच्याक़़डे संस्कृत श्लोक आणि त्यांचे उच्चार,भाषेवर काम हे व्हायचं. आमच्या घरी मराठी वाचन,संस्कृत श्लोकांवर खूप काम व्हायचं. हे सगळं पाठांतर असल्यामुळे मला अभिनयातही रुची निर्माण होईल, हे बाबांनी हेरलं होतं. "
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "कॉलेज संपल्यानंतर बाबांनी विचारलं, तुला पुढे काय करायचं.तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला हे नाटक वगैरे करणं खूप आवडतंय. त्यानंतर मग बाबांच्या सल्ल्याने मी अकॅडमी ऑफ थिएटर्समध्ये प्रवेश घेतला.इतकं सगळं छान आखिव-रेखीव आयुष्य झालं. त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये सहभाग घेतला तिथे महाराष्ट्र भरातून पाच हजार विद्यार्थी आले होते. त्यावेळी मुलींमधून मी पहिली आले आणि मुलांमधून निलेश साबळे पहिला आला."
माझ्या बाबाचं स्वप्न होतं की...
"माझ्या बाबाचं स्वप्न होतं की मी रितरस प्रशिक्षण घेतलं पाहिजे.मी अकॅडमीमध्ये पहिली आले होते. आणि मी जेव्हा माझा रिझल्ट घेऊन घरी आले तेव्हा बघते तर माझे वडील गेले होते. तो रिझल्ट पाहण्यासाठी ते नव्हते. त्या दु :खातून बाहेर पडण्यासाठी माझ्या नातेवाईकांच्या सल्ल्याने महाराष्ट्राची सुपरस्टार मध्ये सहभाग घेतला आणि मी हा शो जिंकले."असा भावुक प्रसंग अभिनेत्रीने या मुलाखतीत शेअर केला.