"रात्री १२.३० ला एका अनोळखी नंबरवरुन फोन आला अन्...", मराठी अभिनेत्याने सांगितला चाहत्याचा भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:42 IST2025-05-27T18:36:50+5:302025-05-27T18:42:30+5:30
चाहत्याने कहरच केला! 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्याला भर रात्री फोन केला अन्...

"रात्री १२.३० ला एका अनोळखी नंबरवरुन फोन आला अन्...", मराठी अभिनेत्याने सांगितला चाहत्याचा भन्नाट किस्सा
Swapnil Raajshekhar : स्वप्नील राजशेखर (Swapnil Raajshekhar) हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अलिकडेच ते झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत पाहायला मिळाले. या मालिकेमध्ये त्यांनी चारुहास नावाचं एक महत्त्वपूर्ण पात्र साकारलं होतं. परंतु, नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपताच अनेक प्रेक्षक नाराज झाले आहेत. अशाच एका नाराज झालेल्या चाहत्याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
नुकतीच स्वप्नील राजशेखर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर खास पोस्ट लिहून त्यांचा एका जबरा फॅनचा मजेशीर किस्सा सांगितला आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, काल रात्री १२.३० वा एक अपरिचित नंबर वरुन फोन आला. अशा वेळीचे फोन आपण घेतो… अवेळी कुणी उगाच फोन करणार नाही.. मी हॅलो म्हणताच पलिकडुन आवाज आला.. “साहेब तुमची सिरीयल बंद झाली ??” मी दचकुन बाहेर बघितलं, अंधार होता. रात्रीचेच १२.३० वाजले होते.. मी तरीही संयमाने विचारलं “क.. कोण बोलतंय?!” “अमुक अमुक बोलतोय”, माझ्याकडे नंबर सेव्ड नव्हता, सदर गृहस्थ माझ्या परिचयाचे नव्हते… आठवत तरी नव्हते….आणि अचानक रात्री १२.३० वा. “सिरीयल बंद झाली का?!” हे विचारायला फोन करणाऱ्या अनोळखी गृहस्थांशी कसं डिल करायचं याचं प्रशिक्षण झालेलं नसल्याने मी खचलो… मी सावरत अन संयमाने विचारलं “हे विचारायला तुम्ही यावेळी फोन केलात ?” त्यांचं उत्तर ‘जडावल्या’ आवाजात आलं असतं तर मला बरं वाटलं असतं."
त्यानंतर स्वप्नील यांनी लिहिलंय, “जान दो पिएला है” हे आपल्या मनाची समजूत घालायला बरं असतं!! पण ते पिएले वाटत नव्हते…“आत्ता पोस्ट बघीतली तुमची.. मग म्हटलं विचारावं” असं काही तरी म्हणाले.. गृहस्थ चांगले शिकलेले होते..मी हताशपणे फक्त फोन कट केला . नंबर ब्लॉक केला.“मालिकेच्या एका हार्डकोर चाहत्याला सिरीयल बंद झाल्याची पोस्ट पाहुन आपलं कुणीतरी गचकल्याचं फिलींग आलं, आणि त्या ईमरजंसी मधे त्यानी ढचकन फोन काढून लावला..’ ईतकं सहज आहे हे.. जग सगळं नॉर्मल सुरुय” असं मनाला समजावत मी पुन्हा झोपी गेलो. अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दरम्यान, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा चाहतानवर्ग फार मोठा आहे. जवळपास २ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका बंद झाली आहे.