साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:01 IST2025-07-08T15:57:22+5:302025-07-08T16:01:04+5:30
"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण...", साई बाबाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद गवळी काय म्हणाले?

साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण..."
Milind Gawali: 'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून मिलींद गवळी हा चेहरा घराघरात पोहोचला. या गाजलेल्या मालिकेत त्यांनी साकारलेला अनिरुद्ध देशमुख प्रेक्षकांना प्रचंड भावला. दरम्यान, या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही मिलिंद गवळी (Milind Gawali) कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अशातच ते सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.
नुकतीच मिलिंद गवळींनीसोशल मीडियावर खास पोस्ट लिहून साई बाबांच्या दर्शनाचा सुखद अनुभव शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, "मी माझ्या लहानपणापासून हेच ऐकत आलो आहे की शिर्डीच्या साईबाबाचं बोलणं येतं, आजीकडून व आईकडून हेच मला ऐकायला मिळालं "मी नवसाचा आहे", माझ्यासाठी आई साईबाबांकडे नवस केला होता, अनेक वेळेला शिर्डीला गेलो, प्रत्येक वेळेला साईबाबांचा बोलूनच होतं ते, एकदा मी असं ठरवलं, माझं काम हीच माझी पूजा आहे, मी कुठल्याही देवळात जाणार नाही मी माझं काम प्रामाणिक करत राहणार, तेव्हाच मला एका सिरीयल साठी विचारण्यात आलं , आणि ती सिरीयल होती शिर्डीच्या साईबाबांवर ,मला बायजाबाई चा मुलगा "तात्या कोते" चा रोल देण्यात आला, शिर्डी पासून दोन किलोमीटर वर एका शेतामध्ये संपूर्ण द्वारकामाई चा सेट लावला होता, अर्थातच साईबाबा यांचा रोल सुधीर दळवीच करत होते, तेव्हा पण माझ्या मनात आलं की बाबांनी मला शिर्डीला बोलावून घेतला आहे, मी चालत साईबाबा यांच्या मंदिरात जायचो, सिरीयल बनवणारे लोकं श्रद्धाळू किंवा बाबांचे भक्त नव्हते, दिवसाचे शूटिंग संपवून नित्यनियमाने दारू प्यायला बसायचे, मला ही गोष्ट खूप खटकत होती, सात आठ दिवसाचा शूटिंग झाल्यानंतर पाऊस वारा वादळ आलं आणि तो शेतामधला द्वारकामाईचा संपूर्ण सेट उध्वस्त झाला. ती सिरीयल बंदच पडली."
त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय, "गेल्या आठवड्यापासून काही ना काही निमित्ताने बाबांचा विषय निघत होता, शिर्डीतल्या एका परिचयांचा फोन आला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीला या, एक बातमी वाचली समृद्धी हायवेने शिर्डीला अगदी अडीच तिन तासामध्ये पोहोचतो, मनात आलं हे बाबांचं बोलवण आहे, माझ्या नवीन हिंदी मालिकेचं शूटिंग पण तीन-चार दिवस नव्हतं, आषाढी एकादशी पण होती, पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं, वाटलं शिर्डीला जाऊ, दीपाला म्हटलं सुट्टी आहे शिर्डीला जाऊया का? एका पायावर तयार झाली, सकाळी गाडी काढली समृद्धी हायवेने शिर्डीला कधी पोहोचलो कळलं सुद्धा नाही."
साईबाबांचा आशीर्वाद घेऊन घरी निघालो...
"इडलीवड्याचा नाश्ता करायला शिर्डीत स्वामी मद्रास ला गेलो, तर तिथे हॉटेलचे मालक विश्वनाथ (बाबा)अय्यर भेटले(८० वर्षाचे अतिशय गोड प्रेमळ गृहस्थ)म्हणाले आषाढी एकादशी च्या चांगल्या दिवशी आला आहात मंदिरात धूप आरती करा, बाबांच्या दरबारात बाबांच्या अगदी समोर उभं राहून ४५ मिनिटं धुप आरती केली. आषाढी असल्यामुळे पांडुरंगाची पण पूजा झाली, खूप गोड आणि सज्जन माणसांच्या भेटी गाठी झाल्या, बाबा अय्यर, त्यांचा चिरंजीव प्रसाद, बजरंगी, इन्स्पेक्टर महेश, मंदिरातले पुजारी, कर्मचारी, आणि असंख्य सिरीयल बघणारे गोड प्रेक्षक. असंख्य लोकांचे प्रेम, गोड आठवणी घेऊन, साईबाबांचा आशीर्वाद घेऊन, माझ्या नवीन कामासाठी भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही दोघं परत घरी पोचलो. सचितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय...", अशी पोस्ट लिहून मिलींद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.