औरंगजेब कबर वादावर मराठी गायकाची पोस्ट, म्हणाला, "आपल्याला शत्रूची गरज नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:25 IST2025-03-18T14:25:35+5:302025-03-18T14:25:55+5:30
महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे.

औरंगजेब कबर वादावर मराठी गायकाची पोस्ट, म्हणाला, "आपल्याला शत्रूची गरज नाही..."
Mangesh Borgaonkar : मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीवरुन (Aurangzeb Tomb Controversy) सध्या वाद सुरु आहे. महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. आता औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा सकाळपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेने यासाठी काल (१७ मार्च) मोठं आंदोलन पुकारलं. मात्र, या आंदोलनाला गालबोट लागलं असून, दंगलसदृश स्थिती निर्माण झाली. परिणामी आजही नागपूरमधील काही भागांत तणावपूर्ण शांतता असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगल सदृश्य परिस्थितीनंतर मराठी कलाकार मंगेश बोरगांवकर (Mangesh Borgaonkar) याने स्टोरी शेअर केली आहे.
मंगेश बोरगांवकर हा लोकप्रिय मराठी गायक आहे. 'सारेगमप'मधून घराघरांत पोहोचलेला मंगेश सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो राजकीय व सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना अनेकदा दिसून येतो. आता त्यानं औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू असलेल्या वादावर इन्स्टाग्रामवर मार्मिक स्टोरी शेअर केली आहे. त्याने लिहलं,"वर्तमान…. भविष्याचे मूलभूत प्रश्न समोर असताना भूतकाळात रमणारे आपण. आपल्याला शत्रूची गरज नाही; आपणच पुरे आहोत!". महागाई, बेरोजगारी, हत्या, शेतकरी आत्महत्या असे मुलभूत प्रश्न बाजूला सारुन 'औरंगजेबाची कबर' या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जात आहे, हे दाखवणारं एक कार्टून शेअर करत त्याने ही स्टोरी लिहली.
दिल्लीचा शहनशहा असलेल्या औरंगजेबाचा १७०७ मध्ये अहिल्यानगर (तत्कालीन अहमदनगर) येथे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला. मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं, असं इतिहासकार सांगतात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं खुलताबादमधील ही कबर बांधली. त्याकाळी ही कबर बनवण्यासाठी १४ रुपये १२ आणे इतका खर्च आल्याचं सांगितलं जातं.