हृता दुर्गुळे टेलिव्हिजनवर कमबॅक करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाली- "तेवढी कमिटमेंट आता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:02 IST2025-09-09T11:52:42+5:302025-09-09T12:02:57+5:30
हृता दुर्गुळे पु्न्हा टेलिव्हिजनवर दिसणार? अभिनेत्रीने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...

हृता दुर्गुळे टेलिव्हिजनवर कमबॅक करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं, म्हणाली- "तेवढी कमिटमेंट आता..."
Hruta Durgule : मराठी सिनेसृष्टीतील 'ब्यूटी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. आपल्या सहसुंदर अभिनयाच्या जोरावर तिने कधी वैदेही तर कधी दीपून म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. वेगवेगळ्या मालिका,चित्रपट तसेच रंगभूमीवरही या अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे. 'दुर्वा', 'फुलपाखरू' मालिकांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. एकेकाळी मालिकाविश्व गाजवणारी ही नायिका मागील काही वर्ष मालिकांमध्ये दिसली नाही.त्यामुळे तिला टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी चाहत्यांना आतुरता लागली आहे. आता यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली.
सध्या हृता दुर्गुळे तिचा आगामी चित्रपट 'आरपार'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिची आणि ललित प्रभाकरची जोडी जमणार आहे. याचनिमित्ताने सकाळ प्रिमिअरला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने ती पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक करणार का या प्रश्नाचं अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.या मुलाखतीमध्ये हृता दुर्गुळे म्हणाली,"मी याआधी १० वर्ष टेलिव्हिजनवर काम केलं आहे. तर तेवढी कमिटमेंट मी आता नाही देऊ शकत. कारण, एक कलाकार आणि एक माणूस म्हणून मला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.यापूर्वी मी टेलिव्हिजनवर काम करताना उद्देश वेगळा होता. आता मला असं वाटतं की मी आता तेवढ्या प्रामाणिकपणे काम नाही करु शकत. तिथे अभिनयाला तितका वेळ देण्यापेक्षा माझा जास्त वेळ हा जास्त इतर कामांमध्ये जाईल. ते मला नकोय."
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली,"असं नाही की मला फोन येत नाही किंवा विचारलं जात नाही. मला टेलिव्हिजनसाठी काम करणं आवडतं. पण, सध्या ते व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. कारण, एका माणसाला अॅडजस्ट करण्यासाठी ६० ते ७० लोकांचं युनिटला त्याचा फटका बसतो. हे सगळं मी आधीच्या मालिकेत काम करताना पाहिलंय. जेव्हा मी नाटक,मालिका आणि चित्रपट एकाचवेळी करत होते. त्यामुळे या सगळ्यात दमछाक आपलीच होते."असं स्पष्ट मत हृताने मांडलं.
हृताने अनेक मालिका, नाटक आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. याशिवाय 'मन उडू उडू झालं' या मालिकेत ती दिसली होती. 'टाइमपास ३', 'अनन्या', 'सर्किट', 'कन्नी' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. '