"किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा?", घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला वैतागली रुपाली भोसले, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:44 IST2025-07-25T11:42:01+5:302025-07-25T11:44:36+5:30
घोडबंदर रोडची अवस्था पाहून रुपाली भोसलेने व्यक्त केला संताप, म्हणाली...

"किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा?", घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला वैतागली रुपाली भोसले, म्हणाली...
Rupali Bhosale Video: सध्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. वाहतूक कोंडीची ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. सामान्य जनतेसह अनेक कलाकार मंडळींनादेखील या वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या समस्येबद्दल अनेक कलाकार व्यक्त होत असतात. अशातच 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने सोशल मीडियावर मीडियावर शेअर केलेला व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
कामानिमित्त ठाणे-घोडबंदर रोडवरुन प्रवास करताना रस्त्याची अवस्था पाहून अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये रुपाली म्हणते, "ज्या रस्त्यावरुन कामावर जाताना रोज अर्धा तास लागतो. त्याच रस्त्यावर तुम्हाला २ तास लागत असतील तर याला रस्ता म्हणावं का? वाईट, बेक्कार अवस्था आहे या घोडबंदर रोडची...", शिवाय व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "काय अवस्था आहे किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा ? ५ वर्ष 'आई कुठे काय करते' च्या वेळी मी विरारहून यायचे तेव्हा सुद्धा हे असंच होत आणि आज सुद्धा रात्रभर शूट करून सकाळी ५ः३० ला घरी निघाले तर या घोडबंदरला आधी ट्रैफिक मग हा सुंदर रस्ता… १२/१४ तास शूट मग २ तास हा असा प्रवास, कधी होणार हे नीट ??" असं म्हणत रुपालीने संताप व्यक्त केलाय. गेल्या ५ वर्षात घोडबंदर परिसरातली ही परिस्थिती कधी सुधारणार असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरी यांनाही तिने टॅग करून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, रुपाली भोसलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'आई कुठे काय करते' या मालिकेनंतर नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. तसंच काही हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. लवकरच ही अभिनेत्री 'लपंडाव' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.