Radhika Deshpande : "वयम् मोठम् खोटम्"; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची संभाजी भिडेंसाठी स्पेशल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 16:09 IST2023-05-31T15:59:03+5:302023-05-31T16:09:28+5:30
Radhika Deshpande And Sambhaji Bhide : राधिकाची आता आणखी एक नवी पोस्ट आता व्हायरल होत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंसाठी तिने खास पोस्ट केली आहे.

Radhika Deshpande : "वयम् मोठम् खोटम्"; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची संभाजी भिडेंसाठी स्पेशल पोस्ट
आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री राधिका देशपांडे आपल्या अभिनयामुळे लोकप्रिय आहे. तसेच विविध मुद्द्यांवर ती नेहमीच भाष्य करत असून सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव्ह आहे. राधिकाची आता आणखी एक नवी पोस्ट आता व्हायरल होत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंसाठी तिने खास पोस्ट केली आहे. तसेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती, अभिनेते शरद पोंक्षे आणि संभाजी भिडेंसोबत पाहायला मिळत आहे.
"छडी लागे छम छम"च्या काळातली माणसं
"वयम् मोठम् खोटम्" वाटायला लावणारी
इंदिरा आजी १०३ तर भिडे गुरुजी ९०
सांगली मिरजकडे राहणारी ही पिकलेल्या आंब्या सारखी गोड आणि चिरोट्यांच्या पापुद्र्यांसारखी त्यांची कांती, साजूक तुपाचे पावित्र्य आणि वागण्या बोलण्यातला ओलावा? तेवत असलेल्या समयीच्या वातीतला. वटवृक्षाच्या झाडासारखी मातीत घप्प मुळांचे गोफ गुंफित तटस्थ उभी. त्यांना पारंब्या तरी किती!
त्यांच्या सावलीत काही क्षण वेचता आले, पारंब्यांवर झुलता आले.
आजी होती मऊ मऊ. तर गुरुजींच्या नजरेतून एकही गोष्ट सुटली नाही. विलक्षण!
मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते.
करं जोडोनी मागते मी तुजला
"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा"" असं राधिका देशपांडे हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी राधिकाची एक पोस्ट तुफान व्हायरल झाली. भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला संताप व्यक्त केला होता. बालनाट्य शिबिरासाठी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी राधिका प्रयत्न करत होती. मात्र कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे तिला अडचणींचा सामना करावा लागला. चार कागद, दोन सह्या, एक शिक्का... अशा आशयाच्या पोस्टमध्ये तिने आपला संताप व्यक्त केला होता. त्यानंतर तिची आणखी एक पोस्ट लक्ष वेधून घेत होती.
"चार हात, दोन फोन, 'एक'नाथ; शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…"
अभिनेत्री राधिका देशपांडे हिला बालनाट्य शिबिरासाठी शासनाचा हॉल मिळाला आहे. तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. "चार हात, दोन फोन, एक नाथ. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट केली होती. मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्यापर्यंत पोहोचली. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. "एक नाथ कसा असावा तर असा!" धन्यवाद" असं म्हटलं होतं.