"काहींना ते निगेटिव्ह वाटलं, पण...", लग्नामध्ये नंदीवरून केलेल्या एन्ट्रीवर प्राजक्ता गायकवाडचं स्पष्टीकरण, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:26 IST2025-12-16T13:17:58+5:302025-12-16T13:26:26+5:30
लग्नात नंदीवरून केली एन्ट्री, 'त्या' ट्रोलिंगवर प्राजक्ता गायकवाडने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली-"डीजे लावून लोक..."

"काहींना ते निगेटिव्ह वाटलं, पण...", लग्नामध्ये नंदीवरून केलेल्या एन्ट्रीवर प्राजक्ता गायकवाडचं स्पष्टीकरण, म्हणाली...
Prajakta Gaikwad: 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. अलिकडेच २ डिसेंबर रोजी प्राजक्ता लग्नबंधनात अडकली.गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा होती. अखेर प्राजक्ताने शंभुराज खुटवड यांच्यासोबत लग्नगाठ बांधून खुटवडांची सून झाली. दरम्यान, प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या लग्नाचे, मेहंदी आणि हळदीचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल झाले. लग्नाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असतानाच, शंभुराज आणि प्राजक्ता यांच्या एन्ट्रीच्या एका व्हिडीओमुळे या जोडप्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.त्याबद्दल प्राजक्ताने स्पष्टीकरण दिलं आहे.
नुकतीच प्राजक्ता गायकवाड आणि तिचे पती शंभुराज खुटवड यांनी 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. त्यादरम्यान, प्राजक्ताला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली," खरंतर, जसं बाकीच्यांचं लग्न होतं तसंच हे नॉर्मल लग्न होतं. पण, लोकांना हे लग्नकार्य आपलंसं वाटलं.सगळ्यांनी ते आपुलकीने ते उचलून धरलं. हे लग्न इतरांसारखंच साधं होतं, सर्व पारंपरिक विधी झाले. पण लोकांनी ते आपुलकीने स्वीकारलं. रिल्स, फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले. माझ्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील लोकांशी असलेला कनेक्ट यामागचं कारण असावं. बाकी लग्नामध्ये आम्ही काहीही वेगळं केलं नव्हतं."
मग प्राजक्ताने सांगितलं, "मला लग्नात अवाजवी खर्च करायचा नव्हता.मर्यादित लोकांत साधं लग्न करावं, असं माझं मत होतं. पुण्यामध्ये होणाऱ्या लग्नांमध्ये पाच-दहा हजारांचा क्राऊड असतोच. इतक्या मोठ्या लेव्हलची लग्न पुण्यात होतात. शिवाय लोकांची मानसिकता अशी असते की, एक पदार्थ खायचा असतो आणि ताटामध्ये खूप पदार्थ घेतलेले असतात. त्यामुळे खूप अन्न वाया जातं. सगळीकडे अन्न सांडलेलं असतं असं मला अजिबात होऊ द्यायचं नव्हतं.आई-वडिलांच्या कष्टाने कमावलेले पैसे वाया जाऊ नयेत, हीही भावना होती. सुरुवातीला महाबळेश्वरला डेस्टिनेशन वेडिंग ठरवलं होतं, पण नंतर काही कारणांमुळे लग्न पुण्यात करावं लागलं आणि पाहुण्यांची संख्या वाढली. तरीसुद्धा सगळा कार्यक्रम खूप छान पार पडला."
लोकांनी लग्नात नंदीवरून आमची एन्ट्री बघितली आणि...
लग्नातील त्या स्पेशल एन्ट्रीवरून होणार्या टीकेवर स्पष्टीकरण देत प्राजक्ता म्हणाली,"लग्नातील सगळे इव्हेंट्स साधे आणि सुटसुटीत ठेवले होते. संगीत, हळद आणि विशेषतः आमची एन्ट्री लोकांना खूप आवडली,काहींना ते निगेटिव्ह वाटलं. माझा विश्वास आहे की लग्नाच्या दिवशी वधू-वर हे फक्त स्त्री-पुरुष नसून लक्ष्मी-नारायणाचं स्वरूप असतात, याचा उल्लेख पुराणांतही आहे. नंदीवरून केलेली आमची एन्ट्री ही शिव-पार्वती विवाहाची संकल्पना आणि शिवगणांशी जोडलेली होती. मोठा आवाज करून डीजेवर नाचगाण्याऐवजी काहीतरी स्पिरिच्युअल आणि अर्थपूर्ण करायचं होतं. कुठेतरी मोठ्याने डीजे लावलाय आणि सगळे नाचतायत, अशी एन्ट्री मला अजिबात नको होती. शिवाय त्यांचं नाव शंभुराज असल्यामुळे ही संकल्पना नावाशीही जोडलेली होती."