"गाडी १५० च्या स्पीडला डिव्हायडरला धडकली अन्...", प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला अपघाताचा 'तो' भयावह प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:16 IST2025-10-10T10:10:26+5:302025-10-10T10:16:09+5:30
"मी तशीच झोपेतच संपले असते", 'त्या' जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावली प्रियदर्शीनी इंदलकर, म्हणाली...

"गाडी १५० च्या स्पीडला डिव्हायडरला धडकली अन्...", प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला अपघाताचा 'तो' भयावह प्रसंग
Priyadarshni Indalakar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळाली. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून या अभिनेत्रीला ओळखलं जातं. सध्या प्रियदर्शिनी दशवतार या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात आता प्रियदर्शिनी तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या एका अपघाताचा भयावह प्रसंग शेअर केला आहे.
नुकतीच प्रियदर्शिनी इंदलकरने 'MHJ UNPLUGGED' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ९ वीत असताना घडलेल्या अपघाताविषयी सांगितलं. त्या प्रसंगाविषयी बोलताना ती म्हणाली, "माझ्या हातावरची जी खूण आहे, त्याबद्दल मला अनेक जण मेसेज करून विचारतात कसली खूण आहे? तर ती त्या अपघाताची खूण आहे. मी आणि आई प्रवास करत होतो, पुणे-सातारा आणि मध्ये वाळूंज नावाचं गाव आहे, तर तिथे १५० च्या स्पीडला गाडी डिव्हायडरला धडकली. मला माहित नाही काय झालं, आईला कदाचित झोप लागली आणि टायर फुटला, काटा १५० ला अडकला होता, त्यामुळे कळलं की, गाडी १५०च्या स्पीडला धडकली.
त्यानंतर पुढे प्रियदर्शिनी सांगितलं, "मी मागे झोपलेली आणि आडवी झोपल्यामुळे जेव्हा गाडी धडकली तेव्हा मी खाली पडले. गाडीचा जो बम्प असतो तो माझ्या पोटात लागला आणि आतमध्ये रक्तस्त्राव झाला. त्यामुळे माझी स्प्लीन कट झालेली आणि डाव्या हातावर झोपले होते, त्यामुळे त्या हातावर जोर पडला आणि फ्रॅक्चर झाला. तर बाहेरून असं दिसत होतं की, सगळं नॉर्मल आहे फक्त दुखतंय. आईची अवस्था खूप वाईट झालेली. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे होतं. माझे डोळे उघडत नव्हते, मी झोपलेले. खूप लोक जमलेत असं जाणवत होतं आणि ते म्हणत होते की, मी रडत म्हटलं माझ्या आईला वाचवा. तेव्हा त्यांनी मला नंबर विचारला, आणि मी त्या अवस्थेत घरचा नंबर सांगितला. नेमका तो फोन नेमका माझ्या आजी-आजोबांनी उचलला. त्यामुळे त्यांची अवस्था खराब झाली, नंतर सर्वांना समजलं. तेव्हा माझे बाबा चेन्नईमध्ये होते. ते पहिली फ्लाईट पकडून आले."
...तर मी तशीच झोपेतच संपले असते
त्यादरम्यान,"मी फक्त म्हणत होते, पोटात दुखतंय. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली. तेव्हा समजलं की, माझी अवस्था खूप वाईट आहे. माझं HBS तीन की चार झालेलं आणि ते समजलं नसतं तर मी तशीच झोपेतच संपले असते. पण, माझी योग्यरित्या काळजी घेतली त्यासाठी डॉक्टरांचे मनापासून आभार मानते." असा खुलासा प्रियदर्शिनीने मुलाखतीत केला.