"१० महिने मानधनच नाही...", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी मालिकेत काम करण्याचा अनुभव, म्हणाली-"देवाच्या कृपेने…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:46 IST2025-12-16T16:45:08+5:302025-12-16T16:46:47+5:30
हिंदी मनोरंजनविश्वात काम करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकाराचं असतं.

"१० महिने मानधनच नाही...", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी मालिकेत काम करण्याचा अनुभव, म्हणाली-"देवाच्या कृपेने…"
Kadambari Kadam: हिंदी मनोरंजनविश्वात काम करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकाराचं असतं. त्यात जर एखादा चित्रपट किंवा मालिकेत मातब्बर कलाकार असतील तर त्यांच्यासोबत करण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. काहीतरी नवीन शिकायला मिळेल, याच विचाराने हिंदी प्रोजेक्ट्ससाठी कलाकार होकार देतात.मात्र, बऱ्याचदा त्यांच्या वाट्याला वाईट अनुभव येतात. असाच काहीसा अनुभव मराठी इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीला आला होता. या अभिनेत्रीचं नाव म्हणजे कादंबरी कदम.
'अवघाची संसार','तुजविण सख्या रे' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री कादंबरी कदम घराघरांत पोहोचली. तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिका तसेच रंगभूमीवरही काम केलं आहे. नुकतीच कांदबरी कदमने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल भाष्य केलं. त्यावेळी तिने हिंदी मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली,"सगळ्याच प्रोजेक्टमधून आपण काहीतरी शिकतच असतो. मी एक हिंदी मालिका करत होते, ज्याचं नाव मी सांगू शकत. ती मालिका एका नावाजलेल्या हिंदी चॅनलची होती. खूप मोठे प्रोड्यूर्स होते. जेव्हा तुम्ही मालिका सुरु करता त्याच्यानंतर तीन महिन्यांतर तुम्हाला पहिलं मानधन मिळतं. त्यानंतर तुमचं चेकचं सायकल सुरु होतं. त्याच्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, आपण रोज शूटिंगला जातोय. गाडीमध्ये पेट्रोल भरतोय,घर भाडं भरतोय. शिवाय आपण सेटवर १७ ते २० तास काम करतोय आणि पैसेच येत नाहीयेत."
रात्री झोपच यायची नाही…
"जरी आपण सगळे क्रिएटिव्ह फिल्डमध्ये असलो तरी असे अनुभव हे कामाच्या तणावापेक्षा जास्त तणाव देणारं असतं. माझ्यासाठी अर्थार्जनाचं ते एकच माध्यम होतं. मला आठवतंय तेव्हा रात्री झोपच यायची नाही. शिवाय मला कळायचंच नाही की माझ्या कष्टायचे पैसे मी कसे मिळवणं अपेक्षित आहे. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण असतो. पण, देवाच्या कृपेने ती मालिका १० महिन्यांमध्येच संपली. कारण, मालिका मी मध्येच सोडू शकत नव्हते मी तसं केलं असतं तर कदाचित ते पैसे गेले असते. अखेर मग त्यांनी अतिशय क्षुल्लक रक्कम मला दिली आणि माझ्याकडून सही करून घेतली. तो अनुभव माझ्यासाठी खूप कठीण होता."