अभिनयासाठी सोडलं नोकरीवर पाणी, 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्रीने सांगितली स्ट्रगल स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:47 IST2026-02-26T09:46:49+5:302026-02-26T09:47:28+5:30
Gauri kulkarni: नोकरी सोडण्यापासून ते मालिकेत काम करण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता.

अभिनयासाठी सोडलं नोकरीवर पाणी, 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्रीने सांगितली स्ट्रगल स्टोरी
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासाठी आपल्या चांगल्या नोकरी, व्यवसायावर पाणी सोडलं आहे. मराठी कलाविश्वात तर असे अनेक कलाकार आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर चर्चा होतीये ती 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिची. सोशल मीडियावर सध्या सक्रीय असलेल्या गौरीने सुद्धा अभिनयासाठी तिची हातची नोकरी गमावली.
अलिकडेच गौरीने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'आई कुठे काय करते' या मालिकेसाठी हातची नोकरी सोडल्याचं सांगितलं. परंतु, नोकरी सोडण्यापासून ते मालिकेत काम करण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता.
''मी इथे एकटी राहते आणि माझे आई-बाबा बीडमध्ये राहतात. घरात एकटीनं राहणं अवघड असतं. काही वेळेला आपल्याला कोणीतरी आजुबाजूला हवं, असं वाटत असतं. कधी कधी खूप कठीण परिस्थितीतून जावं लागतं. खचून गेल्यासारखं होतं. ब्रेकडाऊन होतो,'' असं गौरी म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''पुण्यात नोकरी करत असताना मी ‘आई कुठे काय करते’साठी ऑडिशन दिलं होतं. ज्यावेळी माझी निवड झाली तेव्हा मी सुरुवातीचे २ महिने पुण्याहून मुंबईला अपडाऊन करायचे. शुटिंग झालं की पुन्हा पुण्याला जायचे. मात्र, एक दिवस कंपनीतल्या मॅनेजरने मला नोकरी सोड असं सांगितलं. 'तुझी खूप नाटकं चाललीयेत, तू कधीही येतेस आणि जातेस, त्यापेक्षा तू नोकरी सोड आता'. असं त्यांनी मला सांगितलं. आणि, हो मी लगेच नोकरी सोडली.''
दरम्यान, 'आई कुठे काय करते' या मालिकेत गौरीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र, ही मालिका संपल्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. सध्या ती सोशल मीडियावर सक्रीय असून नवनवीन व्लॉग्सच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.