"सेटवर पहिली भेट झाली अन्...", 'देवमाणूस'ची निर्माती श्वेता शिंदेची किरण-वैष्णवीसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:58 IST2024-12-20T12:55:32+5:302024-12-20T12:58:04+5:30
मराठी कलाविश्वात लग्नसराईला सुरुवात झालेली पाहायला मिळते.

"सेटवर पहिली भेट झाली अन्...", 'देवमाणूस'ची निर्माती श्वेता शिंदेची किरण-वैष्णवीसाठी खास पोस्ट
Shweta Shinde: मराठी कलाविश्वात लग्नसराईला सुरुवात झालेली पाहायला मिळते. बऱ्याच मराठी कलाकारांनी या वर्षात लग्नगाठ बांधून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. अगदी काही दिवसांपूर्वीच 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड (kiran gaikwad) आणि वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar) हे कलाकार विवाहबंधनात अडकले. कोकणातील सावंतवाडी पॅलेसमध्ये त्यांच्या विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. किरण-वैष्णवीच्या लग्नाला मराठी मालिका विश्वातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. त्यांनी या लग्नात चांगलीच धमालमस्ती केली. अभिनेता निखिल चव्हाण, सागर चव्हाण आणि पूर्वी शिंदे, सुमीत पुसावले यांच्याबरोबर निर्माती श्वेता शिंदे देखील त्यांच्या लग्नात उपस्थित होती. दरम्यान, किरण-वैष्णवीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत श्वेता शिंदेने (shweta Shinde)खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री श्वेता शिंदेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर किरण-वैष्णवीसाठी खास पोस्ट शेअर केल्याची पाहायला मिळतेय. त्यांच्या लग्नाचा सुंदर असा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "सर्वात आधी तुमचं दोघांचंही खूप खूप अभिनंदन, किरण मला खूपच आनंद होतोय... की तुला तुझ्या आयुष्यात पाहिजे होती तशी जोडीदार मिळाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'देवमाणूस' मालिकेच्या सेटवर तुमची पहिली भेट झाली."
पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "तुम्हाला दोघांनाही आयुष्याची एक नवीन सुरूवात करताना पाहून मला फारच आनंद होतोय. तुमचं वैवाहिक जीव आनंदात जावो. असेच कायम आनंदी राहा, हसत राहा, तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून खूप खूप प्रेम!" असं पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
वर्कफ्रंट
मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. ‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही तिने केली.