अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत,'या' लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:31 IST2025-10-07T11:27:21+5:302025-10-07T11:31:28+5:30
एसीपी अपूर्वा पुरोहित येतेय...! टीव्हीची लोकप्रिय नायिका 'या' मालिकेत घेणार एन्ट्री, साकारणार लक्षवेधी भूमिका

अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत,'या' लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री!
Apurva Nemlekar: छोट्या पडद्यावरील मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनत चालला आहे. या मालिकांमध्ये दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना कायम खिळवून ठेवतात. दरम्यान, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तसंच टीआरपीच्या चढाओढीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून हे प्रयत्न केले जातात.कधी गरजेनुसार मालिकेत लीप घेतला जातो तर कधी मालिकेत एखाद्या नव्या कलाकाराची एन्ट्री होते. अशातच स्टार प्रवाहच्या 'शुभविवाह' मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री होणार आहे.
स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. अभिनेता यशोमन आपटे, मधुरा देशपांडे, विशाखा सुभेदार अशा तगड्या कलाकारांची फळी या मालिकेत आहे. मालिकेतील आकाश-भूमीच्या जोडीने प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला आहे. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. रागिणी आत्याचा तिचं कटकारस्थान कोणासमोर येऊ नये म्हणून आकाशचा जीव घेते, असं दाखवण्यात येणार आहे.त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. नुकतीच सोशल मीडियावर स्टार प्रवाहकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे मालिकेत पुढे लीप येणार असल्याचं म्हटलं गेलं. त्याचबरोबर शुभविवाह मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या अभिनेत्रीचं नाव अपूर्वा नेमळेकर आहे.
अलिकडेच अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली.या मालिकेमध्ये सावनी हे पात्र साकारुन अपूर्वाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.विशेष म्हणजे अपूर्वा या मालिकेत पहिल्यांदाच एका पोलीस अधिकारी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. शुभविवाह मध्ये ती एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. त्यामुळे आता अपूर्वा पुरोहितच्या येण्यामागे नेमकं काय रहस्य आहे? तिच्या येण्याने भूमी-आकाशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.