मराठमोळी अभिनेत्री गाजवणार हिंदी टेलिव्हिजन, लोकप्रिय मालिकेत झाली एन्ट्री, प्रोमोमध्ये दिसली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:01 IST2025-11-05T17:59:27+5:302025-11-05T18:01:33+5:30
एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण झालं आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे.

मराठमोळी अभिनेत्री गाजवणार हिंदी टेलिव्हिजन, लोकप्रिय मालिकेत झाली एन्ट्री, प्रोमोमध्ये दिसली झलक
अनेक मराठी कलाकार हे हिंदीतही काम करतात. काही मराठी कलाकार तर हिंदी टेलिव्हिजनचा चेहरा बनले आहेत. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण झालं आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रेक्षकांची लाडकी अक्षया हिंदळकर आहे.
मराठी मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारणाऱ्या अक्षयाने आता हिंदी मालिकेत एन्ट्री घेतली आहे. 'पुष्पा एलएलबी' या मालिकेत अक्षया दिसणार आहे. या मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार आहे. यानंतरच्या कथानकात अक्षया महत्त्वाचं पात्र साकारताना दिसणार आहे. 'पुष्पा एलएलबी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अक्षया दिसत आहे. 'पुष्पा एलएलबी' ही सब टीव्हीवरील मालिका आहे.
अक्षयाने अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत अक्षया मुख्य भूमिकेत दिसली होती. सरस्वती, अबोली या मालिकांमध्ये ती झळकली आहे. रॉकी या सिनेमातही तिने काम केलं आहे. आता तिला 'पुष्पा एलएलबी' या हिंदी मालिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.