मेहेंदी रंगली गं...! मराठी अभिनेत्री लवकरच करणार लग्न; लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार
By कोमल खांबे | Updated: February 7, 2026 09:44 IST2026-02-07T09:44:24+5:302026-02-07T09:44:59+5:30
साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून तिचा मेहेंदी सोहळा नुकताच पार पडला आहे.

मेहेंदी रंगली गं...! मराठी अभिनेत्री लवकरच करणार लग्न; लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार
मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. नुकतंच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून तिचा मेहेंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अनेक मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया हिंदळकर लवकरच लग्न करणार आहे. अक्षया लाँग टर्म बॉयफ्रेंड विशाल निकमसह लग्नाच्या बेडीत अडकत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अक्षयाने मेहंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. मेहेंदी सोहळ्यासाठी अक्षयाने खास लूक केला होता. तिने इरकल साडील पारंपरिक ड्रेस घातला होता. हातावर खास सखी आणि फुलपाखराची डिझाइन मेहेंदीतून काढल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने विशाल निकमला टॅग केलं आहे. "माझ्या मेहेंदीमध्ये तुझं नाव शोधायला तयार राहा", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
अक्षया आणि विशाल गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात विशालने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र सुंदराचं नाव त्याने गुलदस्त्यात ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वीच अक्षया आणि विशालने त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. आता लग्न करत ते संसार थाटणार आहेत. अक्षयाने तुझ्या इश्काचा नादखुळा, साता जन्माच्या गाठी, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर विशाल मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा', 'आई मायेचं कवच', 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकांमध्ये तो दिसला होता. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.