"एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांचं रोखठोक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:31 IST2025-01-12T13:28:52+5:302025-01-12T13:31:35+5:30
"एखादी गोष्ट आवडली नाही, म्हणून...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या-"तुम्हाला अधिकारच नाही..."

"एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांचं रोखठोक उत्तर
Aishwarya Narkar:ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या मराठी मनोरंजविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. 'या सुखांनो या', 'स्वमिनी', 'लेक माझी लाडकी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेली अनेक वर्षे त्यांनी अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी सिनेसृष्टीला त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. अभिनयासह ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरील त्यांच्या रील्स आणि फोटोशूटमुळे कायमच चर्चेत येत असतात. त्यांचे हटके व्हिडीओ, फोटो नेटकऱ्यांची पसंती देखील मिळते. अनेकदा त्यांना त्यांच्या पोस्टमुळे ट्रोलही केलं जातं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. शिवाय ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत खडेबोल सुनावले आहेत.
नुकतीच ऐश्वर्या नारकर यांनी 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, "एखादी गोष्ट आवडली नाही तर तुम्ही ती आवडली नाही म्हणून सांगू शकता. पण, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. त्याचं आयुष्य हे त्याचं आयुष्य आहे. त्याच्या पेजवरुन किंवा तिच्या पेजवरुन तिने काय दाखवायचं, काय करायचं हे तिचं ती ठरवणार आहे. तुम्ही बघून त्याच्यावर उगागच वाट्टेल त्या चर्चा करुन आणि वाट्टेल ते मतप्रदर्शन करून समोरच्याचं मानसिक आरोग्य वाया घालवण्याचं तुम्हाला काही अधिकारच नाहीये. तर ते खूप चुकीचं आहे."
पुढे त्या म्हणाल्या, "आपल्याकडे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे की, त्या बाबतीत अॅक्शन घेणारा ना आपल्याकडे कोणता कायदा आहे किंवा ना आपल्याकडचं पोलीस डिपार्टमेंट यावर काही करु शकत नाही. सोशल मीडियाचे असे काही कायदे देखील नाहीयेत. फक्त तुम्ही त्यांना ब्लॉक करु शकता. मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस तुला बोलायचं कमी करणार नाही. सोशल मीडियावर अशी पेजेस देखील आहेत त्याबद्दल चांगल्या लोकांकडून आम्हाला 'DM' येतात. की अहो, तुमचा फोटो अशा पद्धतीत इथे-इथे वापरला गेला आहे. त्याच्यावर फार वाईट कमेंट केल्या गेल्या आहेत किंवा तो फेस मॉर्फ केला गेलाय. तर त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तू रिपोर्ट केल्याने एक अकाउंट बंद होईल म्हणून विकृती थांबणार नाही." अशा शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं.