"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:47 IST2025-09-10T14:46:44+5:302025-09-10T14:47:30+5:30
सर्वच स्तरातून लालबागचा राजा मंडळावर टीका होत आहे. मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै याने सोशल मीडियावर पोस्ट करत लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. पण, राजाच्या दरबारात सामान्य भाविक आणि व्हिआयपी दर्शनावरुन नेहमीच वाद झाल्याचं दिसून येतं. यावर्षी लालबागचा राजा दरबारातील काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. त्यानंतर विसर्जनाला वेळेत न पोहोचल्याने लालबागचा राजाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रात्री झाले. त्यामुळे सर्वच स्तरातून लालबागचा राजा मंडळावर टीका होत आहे.
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै याने सोशल मीडियावर पोस्ट करत लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान हाच मंडळाचा खरा चेहरा असल्याचं त्याने म्हटलं आहे. तर आज कर्मही 5G नेटवर्कवर आहे. त्यामुळे कर्माची फळं लगेच परत मिळतात, असंही त्याने म्हटलं आहे.
राजा तो राजा असतो, आणि तो सर्वांचा असतो!
लालबागचा राजा, मंडळ आणि विसर्जनाची एकंदर अपयशता.
इतकं मोठं मंडळ, हातात अफाट पैसा... एकाबाजूला व्हीआयपी लोकांना प्राधान्य देऊन विशेष दर्शनाची सोय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान... हेच त्या मंडळाचं खऱ्या चेहऱ्यावरचं आरस्पानी प्रतिबिंब दिसलं. इतकंच नाही तर कोळी बांधवांना दर्शन नाकारुन त्यांचा अपमानही करण्यात आला.
पण राजा तो राजा असतो, आणि तो सर्वांचा असतो! अनंत चतुर्दशीला हे अगदी स्पष्ट झालं. जेव्हा राजा अधांतरी पाण्यात विसर्जनासाठी उभा होता, तेव्हा त्याच्या शेजारी त्याच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते नव्हते, तर कोळी बांधव तब्बल १२ तास त्याच्यासोबत खंबीरपणे उभे होते.
शेवटी रात्री १० वाजता कोळी बांधवांच्या मदतीनेच विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि राजा आपल्या गावी परत गेला. मात्र, जे दृश्य डोळ्यांना दिसलं...राजा पाण्यात पाठ फिरवून उभा असताना...ते मनाला पिळवटून टाकणारं अतिशय वेदनादायी होतं. आता तरी मंडळाने समजून घ्यायला हवं की भेदभाव हा भक्तीचा भाग नसतो.
धडा- आज कर्मही 5G नेटवर्कवर आहे. त्यामुळे कर्माची फळं लगेच परत मिळतात. लालबागचा राजाचा विजय असो...
दरम्यान, लालबागचा राजा विसर्जनाला झालेला उशीर हे वादाचं कारण ठरलं आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रात्री झालेलं विसर्जन यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.