"कर्तृत्व नसणाऱ्यांना पुरस्कार मिळतोय, मग मलाही...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:26 IST2025-06-07T13:26:24+5:302025-06-07T13:26:43+5:30

अनेकांना संबंध नसतानाही पुरस्कार दिले जात आहेत अशीही खंत नुकतीच एका मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.

marathi actress aarti solanki disappointed as celebrities those who have no right are getting award | "कर्तृत्व नसणाऱ्यांना पुरस्कार मिळतोय, मग मलाही...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

"कर्तृत्व नसणाऱ्यांना पुरस्कार मिळतोय, मग मलाही...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

मराठीतील अनेक कलाकार आज उघडपणे खंत व्यक्त करताना दिसतात. जे इतक्या वर्षांपासून काम करत आहेत त्यांना अजूनही म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. मात्र काही जणांना फॉलोअर्सच्या जोरावर किंवा इतर गोष्टींमुळे काम, पैसा, प्रसिद्धी मिळत आहे. अनेकांना संबंध नसतानाही पुरस्कार दिले जात आहेत अशीही खंत नुकतीच एका मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.

'फू बाई फू', 'एकापेक्षा एक', 'बिग बॉस मराठी' सारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री आरती सोळंकीने (Aarti Solanki) सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, "ची स्वत:ची कुवत, कर्तृत्व, अभिनयाची योग्यता, कलेची जाण, लिखाणामधील समज, दिग्दर्शनाची जाण या गोष्टींशी काहीही संबंध नाही अशा मूर्ख लोकांनी १५० रुपयांची ट्रॉफी कैलासवासी स्मिता पाटील यांच्या नावाने मला सुद्धा देऊन माझा सत्कार करावा. कारण सध्या कर्तृत्व आणि योग्यता नसणाऱ्यांना ट्रॉफी दिली जाते तर मला सुद्धा हवी आहे."


यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "स्मिता ताई तुम्ही ग्रेट आहात.  तुमची जागा कोणीही घेऊन शकत नाही. मला माफ करा. पण आजची परिस्थिती खूप वाईट आहे. आपली मराठी रंगभूमी ज्या ज्या ज्येष्ठ कलाकारांनी गाजवली आहे आज त्यांच्या नावाने कुणालाही पुरस्कार देण्यात येतोय. फक्त मी मुलगी आहे म्हणून तुमचं उदाहरण दिलंय. मला माफ करा."

आरतीचा रोख नक्की कुणाकडे आहे हे तिने लिहिलेलं नाही. तिने नाव न घेता इंडस्ट्रीतील अनेक लोकांवर टीका केली आहे. याही आधी तिने सूरज चव्हाणला थेट सिनेमा मिळाला त्यावरुन 'मी गरीब आहे' अशी खोचक टिप्पणी केली होती. आताही तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Web Title: marathi actress aarti solanki disappointed as celebrities those who have no right are getting award