"उपाशी आहात की, खिचडी खाताय हे कोणी बघत नाही, पण... ;'आई कुठे...' मधील कांचन आजीने सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:01 IST2025-12-18T13:54:14+5:302025-12-18T14:01:24+5:30
छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेने जवळपास ५ वर्षानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला.

"उपाशी आहात की, खिचडी खाताय हे कोणी बघत नाही, पण... ;'आई कुठे...' मधील कांचन आजीने सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव
Archana Patkar: छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने जवळपास ५ वर्षानंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने अक्षरश चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं. अरुंधती, आप्पा, अनघा आणि यश, कांचन आजी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली. या मालिकेत अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी कांचन आजींची भूमिका साकारली आहे. कठोर तितकीच प्रेमळ असणारी ही आजी अनेकांना भावली. अशातच नुकत्याच एका मुलाखतीमुळे अर्चना पाटकर चर्चेत आल्या आहेत.
अलिकडेच अर्चना पाटकर यांनी 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. यादरम्यान,त्यांनी कठीण काळावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या,"इना मिना डिका नंतरचा तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. हा चित्रपट पुण्यात खूप चालला आणि मुंबईला रिलीज होण्याआधी माझ्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच सुमाराला माझ्या दीराचं लग्न झालं. त्यामुळे मुंबईच्या रिलीडकडे आम्ही जास्त लक्ष देऊ शकलो नाही. राजकमल स्टुडिओजकडे आम्ही डिस्ट्रीब्यूशन दिलं होतं. पण, त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यानंतर आम्ही खूप लॉसमध्ये गेलो होतो. आमच्याकडे जे काही होतं ते सगळं गेलं.
पुढे त्या म्हणाल्या,"माझी सासू तेव्हा मालवणला राहायचा. तर इथे मुंबईत मी, माझे मिस्टर, सासरे आणि मुलगा असे आम्ही राहायचो. इथे सकाळी उठल्यापासून फोन सुरु... अरे, आमचे पैसे कधी देणार असं ते बोलायचे.सगळ्यांचे पैसे देणं भाग होतं. पण, पैसे द्यायचे तर ते कुठून द्यायचे, असा प्रश्न होता. आमच्या काही जागा होत्या पण त्या लगेच विकल्या जात नव्हत्या. रोजचा मनस्ताप होता तो वेगळाच. तिकडे दीरालाही ट्रॉलरच्या बिझनेससाठी पैसे द्यावे लागायचे."
सेटवर तुम्ही कोणत्या गाडीतून येताय हे लोक जास्त बघतात...
या मुलाखतीत इंडस्ट्रीतील वातावरणाबद्दल बोलताना अर्चना पाटकर म्हणाल्या, "आधी मालिका एपिसोडिक असायच्या. ज्यामुळे चार-पाच दिवसांसाठी काम मिळायचं. तेव्हा माझी एक मालिका सुरू होती, तीन नाटकं सुरु होती आणि चित्रपटाचं कामंही होतं. त्या सगळ्यातून मिळणाऱ्या पैशातून मी लोकांची देणी फेडली. आपली इंडस्ट्री अशी आहे की आपण घरी उपाशी आहोत की खिचडी खातोय, हे कुणालाच दिसत नाही. पण, सेटवर तुम्ही कोणत्या गाडीतून येताय हे लोक जास्त बघतात. मुळात आपली इंडस्ट्री अशी आहे. त्यामुळे आपण घरी काय खातो हे कोणी बघत नाही."