"कलाकारांचं दुर्दैव आहे की...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलेंनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:10 IST2025-06-04T15:59:37+5:302025-06-04T16:10:57+5:30
सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलें यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या...

"कलाकारांचं दुर्दैव आहे की...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलेंनी व्यक्त केली खंत
Gargi Phule : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते निळू फुले यांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत लेक गार्गी फुले (Gargi Phule)देखील कलाक्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु त्यानंतर आता मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेऊन गार्गी फुले यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.अशातच अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियावरील फॉलोअर्स पाहून काम देण्याच्या त्या मुद्यावर आपलं मत मांडलं आहे.
अलिकडेच काही महिन्यांपूर्वीच गार्गी फुले यांनी 'वास्तव कट्टा' या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. त्यादरम्यान, हल्ली सोशल मिडियावरचे फॉलोअर्स पाहून काम दिलं जातं का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "इन्स्टाग्रामच्या रिल्समुळे कलाकार बाहेर नाही आले, तर खूप स्टार बाहेर आलेत. कलाकार असणं वेगळं आहे आणि स्टार असणं वेगळं आहे. आता नाटक, सिनेमा, सीरिअल अशा सगळ्याच माध्यमातील कलाकारांचं दुर्दैव आहे की आपण स्टार्स शोधतो, कलाकार नाही शोधत. आपण जर कलाकार शोधले असते तर आज इन्स्टाग्रामचे जे स्टार आहेत त्यांना काम मिळणं बंद झालं असतं. मला खूप वाईट वाटतं की, आम्ही २०-२० वर्ष कलाक्षेत्रात शिक्षण घेतो, प्रशिक्षण घेतो, आम्ही कष्ट करतो तेव्हा आम्हाला कोणीच विचारत नाही. मागून एक रीलस्टार येतो आणि तो अचानक हिरो बनतो, किंवा एक उत्तम काम दिलं जातं. ते तिथपर्यंत पोहोचलं जातं का? हा पुढचा प्रश्न आहे. पण लोकांना हल्ली तेच हवंय का? हा प्रश्न मला पडतो."
पुढे फॉलोअर्स बघून काम काम देण्याबद्दल गार्गी फुले म्हणाल्या," निर्मात्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे का? जर तशीच हवी असेल तर मग चित्रपट चालत नाहीत ही सत्य स्थिती आहे. जर तुम्ही चांगले कलाकार घेऊन एक सकस कथेवर चित्रपट किंवा सिरीअल कराल तेव्हा ते उत्तम चालेल. पण तुम्हाला रील स्टार हवेत! पण त्यांना ते कितपत जमतं." अशा भावना व्यक्त करत गार्गी फुले यांनी प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वर्कफ्रंट
दरम्यान, गार्गी फुले यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाल्या. या मालिकेत त्यांची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे.