"हल्ली उत्सव साजरे करण्यापेक्षा मिरवण्याकडे कल...", मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल मराठी अभिनेत्याने व्यक्त केलं मत, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 13:45 IST2025-08-31T13:38:24+5:302025-08-31T13:45:29+5:30
मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल मराठी अभिनेत्याने व्यक्त केलं मत, म्हणाला- "२५ फूट मूर्त्या..."

"हल्ली उत्सव साजरे करण्यापेक्षा मिरवण्याकडे कल...", मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल मराठी अभिनेत्याने व्यक्त केलं मत, म्हणाला...
Marathi Actor opinion On Mumbai Ganeshotsav: सध्या देशभरात गणेशोत्सवामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. घरोघरी लाडक्या गणरायाचा जागर होत असून बाप्पाच्या भक्तिमध्ये सारेच न्हाऊन गेले आहेत. मनोरंजनविश्वातील बऱ्याच कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.गणेशोत्सव साजरा करा, परंतु हा उत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या. पर्यावरणाकडे लक्ष द्या, असा सल्ला देताना अनेक जण दिसून येतात.दरम्यान, मराठी अभिनेता उदय नेनेने मुंबईतील गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरुपावर आपलं मत मांडलं आहे.
उदय नेने हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सारंग नावाच पात्र साकारतो आहे. अशातच अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. एन पी क्रिएशन्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला, "उत्सव हे साजरे व्हायला पाहिजेत, त्यात काही वाद नाही. पण, त्याचं स्वरुप सध्या अक्राळ-विक्राळ व्हायला लागलं आहे.उत्सव हे साजरे करायचे आहेत मिरवायचे नाहीत. मुंबईत तरी मला असं वाटतं की, उत्सव साजरे करण्यापेक्षा मिरवण्याकडे आपला कल जास्त आहे. यात राजकारणी किंवा कोणती दुसरी संस्था जबाबदार आहे, असं मला वाटत नाही. याला तुम्ही , आम्ही आपण सगळेच जबाबदार आहोत. आता सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एखाद्या विभागात एकच असायला पाहिजे. हल्ली एका गल्ली चार गणेशोत्सव मंडळं असतात. त्यामुळे चार डीजे वाजतात. सगळीकडे ट्रॅफिक जॅम झालेलं असतं, कितीतरी जीवांना अडचण होत असते. जर उत्सव सार्वजनिक आहे तर त्यात एक-दोन किलोमीटरचं अंतर असलं पाहिजे.तर त्यातलं मांगल्य जपलं जाईल भव्यता जपली जाईल.तिथे जाऊन लोकांना पाहावंसं लोकांना वाटेल."
पुढे अभिनेता म्हणाला, "मी माझ्या बिल्डिंगमधून खाली उतरलो की चार सार्वजनिक गणपती. मग मला ती अडचण वाटते. याचा विचार मुंबईसारख्या शहरांमध्ये
जिथे सार्वजनिक रस्ते, ठिकाणे कमी आहेत.अशा शहरांबद्दल लोकांनी विचार केला पाहिजे. आता मुर्त्यांची भव्य दिव्यता!२५ फुटी मुर्तींची काय गरज आहे? बरं, ठीक आहे हा आपला सण आहे. पण,मग अशा चारच मुर्ती शहरात असायला पाहिजेत तर लोक बघायला जातील.प्रत्येक गल्लीचा एक राजा आहे.माझ्या गल्लीत २५ फुटांची गणपतीची मुर्ती आहे. असं करुन निसर्गाची किती होत आहे. आज जर संपूर्ण मुंबईत चारच सार्वजनिक गणपती असतील तर किती मजा येईल बघा. हल्ली मी बघतो पूर्वी की,गायन,वत्कृत्व, नाटक आणि वादविवाद स्पर्धा व्हायच्या याचं प्रमाण कमी झालं आहे. याचं कारण म्हणजे यासाठी जागा नाही आहे. आता त्याऐवजी डीजे असतो, सोशल मीडियामुळे त्याची गरज उरलेली नाही. मग हा फक्त दिखावा आहे, असं मला वाटतं." असं मत अभिनेत्याने मांडलं.