गौरव मोरेचं नव्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, शेअर केली भावुक पोस्ट! वाचून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:54 IST2025-09-26T10:52:31+5:302025-09-26T10:54:22+5:30
"ताडपत्रीचं घर ते फ्लॅट...", गौरव मोरेचं नव्या घराचं स्वप्न पूर्णत्वास आलं, भावुक होत म्हणाला, "माझी नाळ कायम फिल्टर पाडा…"

गौरव मोरेचं नव्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, शेअर केली भावुक पोस्ट! वाचून डोळे पाणावतील
Gaurav More New Home: फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे गौरव मोरे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. केवळ मराठीच नाहीतर गौरवने 'मॅडनेस मचाएंगे' हा हिंदी शो देखील आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर गाजवला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या या अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नुकताच गौरव मोरेने त्याच्या आयुष्यातील खास आणि आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
आयुष्यात आपलं हक्काचं घर आणि गाडी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गौरवनेही आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत.अलिकडेच काही महिन्यांपूर्वी त्याने नवीकोरी गाडी घेतली होती. त्यानंतर आता गौरवचं आणखी एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. नुकताच गौरव मोरेला त्याच्या हक्काच्या घराचा ताबा मिळाला आहे. म्हाडाच्या लॉटरीच्या निमित्ताने त्याचं मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. नव्या घराची चावी मिळाल्यानंतर गौरवने चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली आहे. नुकतीच सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत त्याने लिहिलंय," ताडपत्री ते फ्लॅट, फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपल घर असाव हे कायम मनात होत.लहानपणापासुन वाटत होत जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं. "
यापुढे गौरव मोरेने म्हटलंय, "काल दिनांक २५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला.ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघुन मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केल.माझी नाळ कायम फ़िल्टर पाडा आणि पवई सोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही.माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी @mhadaofficial चे मनापासून आभार मानतो." अशा आनंद भावना त्याने पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.