'धुरंधर'वर फिदा झाले भिडे मास्तर! 'तारक मेहता...' फेम मंदार चांदवडकरांनी केलं सिनेमाचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:25 IST2025-12-26T15:24:02+5:302025-12-26T15:25:00+5:30
बऱ्याच वर्षांनी सिनेमात असं काहीतरी पाहिलं जे..., काय म्हणाले भिडे मास्तर?

'धुरंधर'वर फिदा झाले भिडे मास्तर! 'तारक मेहता...' फेम मंदार चांदवडकरांनी केलं सिनेमाचं कौतुक
'धुरंधर' सिनेमाचे सध्या सगळेच चाहते झाले आहेत. सामान्य लोकच नाही तर अनेक कलाकारही सिनेमाची तोंडभरुन स्तुती करत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सुद्धा सिनेमाचं कौतुक करत अनेक ट्वीट्स केले. आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'फेम अभिनेते मंदार चांदवडकर यांनीही 'धुरंधर'चं भरभरुन कौतुक केलं आहे. गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे मास्तर काय म्हणाले?
'सांस बहू और बेटियां'ला दिलेल्या मुलाखतीत मंदार चांदवडकरांना यावर्षातला सर्वात आवडलेला सिनेमा कोणता ते विचारण्यात आलं. यावर मंदार चांदवडकर म्हणाले, "धुरंधर' सिनेमा आलाय. मीही पाहिला आणि या सिनेमाचा चाहताच झालो. भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय की सिनेमाचा शेवट टी बी कंटिन्यू झाला आहे आणि मार्चमध्ये रिलीज डेटही सांगितली आहे. त्यामुळे पार्ट २ साठी आम्ही कूप उत्सुक आहोत. आदित्य धर यांनी ज्याप्रकारे दिग्दर्शन केलंय आणि सर्व कलाकारांनी जे परफॉर्म केलंय ते अद्भूत आहे. अनेक वर्षात असा सिनेमा आला आहे ज्यात कोणी हिरो नाही. सगळ्या कलाकारांचा तो सिनेमा आहे. सिनेमाची कथाच हिरो आहे. असं खूप कमी वेळा पाहायला मिळतं. दुसरा पार्ट कधी येतोय असं मला झालं आहे."
मंदार चांदवडकर हे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सुरुवातीपासून दिसत आहेत. त्यांना भिडे मास्तर नावानेच जास्त ओळखलं जातं. तर त्यांची पत्नी स्नेहल चांदवडकर सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मराठी मालिकेत दिसत आहे.
'धुरंधर' सिनेमाने जगभरात १००० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर भारतात सिनेमा ६०० कोटींच्या क्लबमध्ये आला आहे. १९ मार्च २०२६ रोजी सिनेमाचा दुसरा पार्ट येणार आहे. या पार्टमध्ये नक्की काय असणार आणि कोण कोण कलाकार दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.