"येऊ की माघारी जाऊ?" ओंकार भोजनेचा 'तात्या' पुन्हा दिसणार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा प्रोमो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:19 IST2025-12-29T13:19:05+5:302025-12-29T13:19:48+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रोमोत ओंकार भोजनेचा सेटवर वैताग पाहायला मिळतोय

"येऊ की माघारी जाऊ?" ओंकार भोजनेचा 'तात्या' पुन्हा दिसणार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा प्रोमो बघाच
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्रेक्षकांचा आवडता शो. गेले काही दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत ओंकार भोजने तात्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज आहे. काय आहे या प्रोमोत?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पुन्हा दिसणार ओंकार
सोनी मराठीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यात तो हास्यजत्रेतील त्याचं प्रसिद्ध कॅरेक्टर तात्याच्या भूमिकेत एन्ट्री घेतो. एन्ट्री घेतल्यावर ओंकार म्हणतो, ''सोटू एन्ट्री आहे की नाही माझी! मगाचपासून वाट बघतोय कोणीच काही सांगना. येऊ की आल्यासारखा माघारी जाऊ?'' पुढे सोटू तात्याला सांगतो, ''आपली एन्ट्री आता नाही ५ जानेवारीला आहे.'' त्यानंतर तात्या सर्वांना ''आता बघावं लागतंय'', असं आवाहन करतात.
अशाप्रकारे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजने पुन्हा एकदा दिसणार आहे. तात्या, मामा ही ओंकारची पात्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये खूप गाजली आणि प्रेक्षकांनाही आवडली. अलीकडच्या काळात ओंकार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून इतर कार्यक्रमांमध्ये दिसला. त्यामुळे ओंकारला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पुन्हा पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवीन सीझन ५ जानेवारीपासून सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना बघायला मिळेल.