लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो, ड्रिंक कॉर्नर अन्...; वनिता खरातने असं सजवलंय मुंबईतील २३व्या मजल्यावरचं घर, दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:59 IST2026-02-10T16:58:01+5:302026-02-10T16:59:36+5:30
वनिता खरातचंही मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होतं. जे अभिनेत्रीने गेल्यावर्षी पूर्ण केलं. २०२५च्या डिसेंबर महिन्यात वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. आता अभिनेत्रीने तिच्या घराची झलक दाखवली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो, ड्रिंक कॉर्नर अन्...; वनिता खरातने असं सजवलंय मुंबईतील २३व्या मजल्यावरचं घर, दाखवली झलक
अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. शाहीद कपूरच्या कबीर सिंग सिनेमामुळे वनिता प्रसिद्धीझोतात आली होती. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. प्रत्येकाच्या स्वप्नांप्रमाणेच वनिता खरातचंही मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होतं. जे अभिनेत्रीने गेल्यावर्षी पूर्ण केलं. २०२५च्या डिसेंबर महिन्यात वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. आता अभिनेत्रीने तिच्या घराची झलक दाखवली आहे.
वनिताने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने तिच्या घराची झलक दाखवली आहे. वनिताने २३व्या मजल्यावर घर घेतलं आहे. घराच्या दारावर तिच्या नावाची सुंदर पाटी लावलेली आहे. वनिताच्या घराला प्रशस्त हॉल आहे. या हॉलमधील एक कोपरा पुस्तकाने सजवलेला आहे. तर दुसऱ्या कोपऱ्याला आरसा असून त्या भिंतीवर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विद्या बालन, रंजना देशमुख या कलाविश्वातील दिग्गजांचे फोटो आहेत. हॉलमध्येच एक खास असा ड्रिंक कॉर्नरही आहे. हॉलमध्ये सोफाही ठेवण्यात आला आहे. तर त्यामागची भिंत आकर्षक पद्धतीने रंगवण्यात आली आहे.
वनिताच्या घरातील बेडरुमही खास आहे. प्रशस्त बेडरुममध्ये छोटा आरसा दिसत आहे. वनिताने तिच्या घरातील कोपरा अन् कोपरा अत्यंत खास पद्धतीने सजवल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, "घर घेतल्यावर कदाचित घ्यायच्या आधीच माझं ठरलं होत की माझं घर कसं दिसेल कसं असेल, अगदी तसच्या तसं किंबहुना त्याहून खूप सुंदर घर सजवलंस तू विनायक. मी तुझ्या हातात मोकळा “फ्लॅट” दिला होता तू त्याचं प्रचंड सुंदर “घर” तयार केलंस...विनायक तुला प्रचंड घट्ट मिठी आणि आयुष्यभरासाठी प्रेम...".