'तुम्हाला वडील म्हणायची लाज वाटते'; लेकीच्या 'त्या' शब्दांमुळे कोलमडून पडले नितीश भारद्वाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 08:03 AM2024-03-11T08:03:02+5:302024-03-11T08:03:25+5:30

Nitish bharadwaj: नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या पत्नीसोबत कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्यांच्या लेकींवर होत आहे.

mahabharat-actor-nitish-bharadwaj-says-his-daughters-say-we-are-disgusted-to-call-you-our-father | 'तुम्हाला वडील म्हणायची लाज वाटते'; लेकीच्या 'त्या' शब्दांमुळे कोलमडून पडले नितीश भारद्वाज

'तुम्हाला वडील म्हणायची लाज वाटते'; लेकीच्या 'त्या' शब्दांमुळे कोलमडून पडले नितीश भारद्वाज

छोट्या पडद्यावरचा एक काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) . बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारुन ते प्रचंड लोकप्रिय झाले. मात्र, सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार येत आहेत. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लेकींचा एक किस्सा शेअर केला. हा प्रसंग सांगत असताना ते प्रचंड भावूक झाले होते.

नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या पत्नीसोबत कायदेशीर लढाई लढत आहेत. स्मिता आणि नितीश यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाले असून ही जोडी लवकरच कायदेशीररित्या विभक्त होणार आहे. इतकंच नाही तर नितीश यांनी त्यांच्या पत्नीवर मानसिक अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत.

अलिकडेच नितीश यांनी 'टेली टॉक इंडिया' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनावर, घटस्फोटाच्या प्रक्रियेवर आणि एकंदरीत या सगळ्याचा त्यांच्या लेकींवर होत असलेल्या गंभीर परिणामांवर भाष्य केलं. पत्नीसोबत सुरु असलेल्या वादाचा परिणाम त्यांच्या लेकींवर झाला. इतकंच नाही तर, 'नितीश यांना वडील म्हणायची लाज वाटते', असं त्यांच्या लेकीने त्यांना म्हटलं. ज्यामुळे ते पुरते कोलमडून गेले.

नेमकं काय म्हणाली नितीश यांची लेक

"माझी ११ वर्षांची लेक मला जे दोन वाक्य म्हणाली ते मी तुम्हाला सांगतो. 'पाप्पा,  तुम्हाला वडील म्हणायची आम्हाला लाज वाटते. किळस वाटते', अशी माझी लेक मला म्हणाली. इतकं सगळं केल्यानंतरही मुली मला असं का म्हणतायेत? मला कळत नाहीये काय झालंय. पण, आई-वडील विभक्त होतायेत याचा परिणाम त्यांच्यावर झालेला दिसतोय. या सगळ्यातून कसं बाहेर पडावं तेच कळत नाहीये. पण, आता मी आध्यात्माचा मार्ग अवलंबणार आहे. ध्यान, गुरु आणि जवळचे मित्र यांच्या मदतीमुळेच मी यातून बाहेर पडेन," असं नितीश म्हणाले.

दुसऱ्यांदा लग्न करणार नितीश भारद्वाज?

"मला असं वाटतंय माझी फसवणूक झाली आहे. आज, ही माझ्या मुलींची लढाई आहे जी मी लढतोय. त्यामुळे मला नाही माहित की, यापुढे मी कोणत्याही दुसऱ्या स्त्रीला न्याय देऊ शकेन की नाही ते. लग्न ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या लग्नसंस्थेवर विश्वास आहे. माझ्या आई-वडिलांसह कितीतरी लोकांची यशस्वी झालेली लग्नं पाहिली आहेत."

दरम्यान, नितीश यांनी मोनिशा पाटील हिच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. २००५ मध्ये ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर नितीश यांनी स्मिता गाटे हिच्याशी लग्नगाठ बांधली.

Web Title: mahabharat-actor-nitish-bharadwaj-says-his-daughters-say-we-are-disgusted-to-call-you-our-father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.