'आई'नंतर मधुराणी गोखले साकारणार 'सावित्रीबाई'! तर ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत अमोल कोल्हे, मालिकेचा प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:33 IST2025-11-18T13:31:22+5:302025-11-18T13:33:29+5:30
सोशिक आईच्या भूमिकेनंतर आता मधुराणी कणखर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' असं या मालिकेचं नाव असून स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होत आहे.

'आई'नंतर मधुराणी गोखले साकारणार 'सावित्रीबाई'! तर ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत अमोल कोल्हे, मालिकेचा प्रोमो समोर
'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी गोखले घराघरात पोहोचली. अरुंधतीच्या भूमिकेने मधुराणीला प्रसिद्धी मिळवून दिली. सोशिक आईच्या भूमिकेनंतर आता मधुराणी कणखर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' असं या मालिकेचं नाव असून स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होत आहे.
नुकतीच स्टार प्रवाहकडून या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. तर मालिकेचा प्रोमोही प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत मधुराणी गोखले स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर डॉ. अमोल कोल्हे हे समाजसुधारक आणि सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेतून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराचा, त्यासाठी समाजाकडून केल्या गेलेल्या अवहेलनेचा तरीही मागे न हटलेल्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांची प्रेरणादायी कथा दाखवण्यात येणार आहे.
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या प्रोमोत सावित्रीबाईंच्या भूमिकेत मधुराणी दिसत आहे. ताटाने शाळेची घंटा वाजवत प्रोमोची सुरुवात होते. शाळेतून मुली बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर सावित्रीबाई त्यांच्या मागोमाग बाहेर येतात. पण, शाळेतून घरी जाताना मात्र वाटेत त्यांना काही समाजकंटकांकडून त्रास दिला जात असल्याचं दिसत आहे. ते पाहून ज्योतिबा फुले यांना त्रास झाल्याचं दिसत आहे. ते शेणाने माखलेला पत्नीचा पाय स्वत:च्या हाताने धुवत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. अंगावर काटा आणणारा असा हा मालिकेचा प्रोमो पाहून ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ५ जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.