शालिनी परतली! स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत एन्ट्री, अजिंक्य ननावरे-एतिशा मुख्य भूमिकेत, प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:27 IST2025-12-12T11:25:44+5:302025-12-12T11:27:16+5:30
'तुझ्या सोबतीने' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री एतशा संझगिरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

शालिनी परतली! स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत एन्ट्री, अजिंक्य ननावरे-एतिशा मुख्य भूमिकेत, प्रोमो समोर
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या नव्या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेतून सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये शालिनीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये माधवीची झलक दिसली होती. तेव्हाच चाहत्यांनी तिला ओळखलं होतं. आता माधवी नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण मालिकेत दिसणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
'तुझ्या सोबतीने' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री एतिशा संझगिरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये किचन दिसत आहे. किचनमध्ये नुपूर पदार्थ बनवत असल्याचं दिसत आहे. तेवढ्यातच माधवीची एन्ट्री होते. अॅपरन आणि हँडक्लोज न घातल्याने माधवी नुपूरला धारेवर धरते. त्यानंतर नुपूर बाहेर जात असताना तिची कंपनीचा मालक असलेल्या मल्हार खानविलकरला धडक बसते. नुपूरचे पिठाने भरलेले हात त्याच्या ब्लेझरवर उमटत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. पण हेच डिझाइन क्लाइंट हळदीसाठी पसंत करतात.
"एकमेकांच्या सोबतीनेच आयुष्यात गोष्टी सावरल्या जातात", असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोने चाहत्यांची मालिकेबाबातची उत्सुकता वाढवली आहे. मालिकेत एतशा नुपूर हे पात्र साकारणार आहे. तर अजिंक्य ननावरे मल्हारच्या भूमिकेत आहे. लवकरच ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे.