"सूर्या दादा तुमचा निरोप घेतोय...", मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "मला सख्खी बहीण नाही पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:17 IST2025-10-05T16:15:54+5:302025-10-05T16:17:13+5:30
मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

"सूर्या दादा तुमचा निरोप घेतोय...", मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला- "मला सख्खी बहीण नाही पण..."
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या 'लाखात एक आमचा दादा' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही मालिका सुरू झाली होती. पण, एका वर्षातच मालिकेला निरोप घ्यावा लागला. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
नितीशने त्याच्या सोशल मीडियावरुन मालिकेच्या सेटवरचे काही खास क्षण शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करत तो म्हणतो, "सूर्यकांत शंकरराव जगताप“ उर्फ “सूर्या दादा”तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतोय पण “सूर्या” मित्रा तू ह्या नितिशला खूप काही दिलंस. तू नवी ओळख दिलीस, नवी ऊर्जा दिलीस, नवं कुटुंब दिलंस, गोड बहिणी दिल्यास. तू खूप काही शिकवलंस रे! मला सख्खी बहीण नसल्यामुळे बहिणीची जबाबदारी, तिचं आयुष्य, जग, तिला कसं सांभाळायचं असतं हे काहीच माहिती नव्हतं. हे सगळं तुझ्यामुळे कळालं. तुझ्यामुळे बहिणींचं प्रेम मिळालं. भावा-बहिणीचं नातं जवळून अनुभवता आलं. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल “सूर्या” मित्रा खरचं तुझा मनापासून आभारी आहे".
पोस्टमधून त्याने मालिकेतील कलाकारांचेही आभार मानले आहेत. "गिरीष सर तुम्ही मित्रासारखे राहिलात म्हणून आम्ही मोकळेपणाने काम करू शकलो. पाच बोटं जुळतात तेंव्हा मूठी तयार होते आणि ताकद येते. माझ्या गोड बहिणींनो तुम्हा चौघीशिवाय हा सूर्या नाहीये हे कायम लक्षात असुद्या. कोमल, समृद्धी, इशा आणि जुई तुम्ही चौघीपण खरंच खूप टॅलेंटेड आहात love you all..छान छान कामं करा. अतुल तू ऑनस्क्रीन शत्रू असलास तरी चांगला मित्र झालास आणि तुझ्या अभिनयाने ऊत्तम खलनायक उभा केलास keep it up भावा...love you. किरण दळवी आम्हा सगळ्यांना तू मोकळेपणाने कामं करण्याचं स्वातंत्र्य दिलंस त्याबद्दल खरचं तुझे आभार", असं त्याने म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा कुटुंबाचा भाग होता आलं. माझ्या सर्व प्रोडक्शन आणि तंत्रज्ञान मित्रांनो तुम्ही होता म्हणून आपला शो उभा राहू शकला. तुझ्यामुळे सूर्या चमकत राहिला. मला सांभाळून घेतल्याबद्दल माझ्या सर्व सहकालाकारांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याबद्दल झी मराठी खरंच तुमचे मनापासून आभार. मायबाप रसिक प्रेक्षक, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही सूर्यावर, बहिणींवर, जगताप कुटुंबावर आणि मालिकेतल्या सर्व कलाकारांवर भरभरून प्रेम केलंत त्याबद्दल तुमचा आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहुद्यात. मी सगळ्यांबद्दल खूप लिहलं होतं पण इथे कॅप्शनमध्ये बसत नाहीये. त्यामुळे थोडक्यात आटपावं लागलं. क्षमस्व...भेटूयात नव्या भूमिकेत".