"सांगली ते मुंबई टेम्पो प्रवास, अंधेरीत पार्किंगमध्ये राहावं लागलं", अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:59 IST2025-07-17T10:57:51+5:302025-07-17T10:59:23+5:30
अभिनेत्रीला सांगलीहून मुंबईत आल्यावर दोन दिवस अंधेरीतील पार्किंगमध्येही राहावं लागलं होतं.

"सांगली ते मुंबई टेम्पो प्रवास, अंधेरीत पार्किंगमध्ये राहावं लागलं", अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
चित्रपटसृष्टी किंवा छोटा पडदा हा जेवढा ग्लॅमरस आहे, तेवढाच तो प्रत्येकासाठी आव्हानात्मकही आहे. प्रत्येक दिवशी तो तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करायला लावतो. काम मिळवण्यासाठी पडेल ते काम करून दिवस काढावे लागतात. या संघर्षात जो टिकतो तो पुढे जातो. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री चर्चेत आली आहे. सांगलीहूनमुंबईला आलेल्या या अभिनेत्रीने नुकतंच तिचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आल्यानंतर तिला दोन दिवस थेट अंधेरीतील पार्किंगमध्ये राहावं लागलं होतं, असा धक्कादायक अनुभव तिनं शेअर केला.
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत रम्याची भूमिका साकारणाऱ्या कश्मिरा कुलकर्णीनं अलीकडेच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या संघर्ष काळावर भाष्य केलं. कश्मिरानं सांगितलं की, ती बालगंधर्व रंगमंदिरात मैत्रिणीच्या नाटकाचे प्रयोग पाहायला जायची. अचानक नाटकातील प्रमुख भूमिका साकारणारी मुलगी गायब झाली आणि दिग्दर्शकांनी कश्मिराला "तू रोज बघतेस ना, ही भूमिका करशील का?" असं विचारलं. यावर कश्मिरानं चालून आलेली संधी घेतली आणि रात्रभर जागून नाटकाची तयारी केली. दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगात तिनं वाखाणण्याजोगं काम केलं. विशेष डॉ. श्रीराम लागू यांनी 'छान केलंस तू बाळा' असं म्हणत कौतुक केल्याचं कश्मिरानं सांगितलं.
विशेष म्हणजे या प्रयोगात कास्टिंग करणारी सुनीता नावाच्या एका मुलीनं कश्मिराला 'चार दिवस सासूचे' मालिकेत एक भुमिका असल्याचं सांगितलं. पण, मुंबई गाठणं सोपं नव्हतं. आईनं दिलेली साखळी विकून काही आवश्यक वस्तू घेतल्या आणि एका टेम्पोमधून तिनं मुंबईचा प्रवास केल्याचं काश्मिरानं सांगितलं. सांगली ते मंबई प्रवासाबद्दल सांगताना कश्मिरा म्हणाली, "७ जूनला मी मुंबईत आले, खूप पाऊस होता. तेव्हा मी अंधेरीत होते आणि ओळखीनं माझी म्हाडाच्या ऑफिसमध्ये राहण्याची सोय झाली होती. कारण, माझं बजेट जास्त नव्हतं. पण तिथे दोन दिवस काम सुरू असल्यानं ते म्हणाले की, दोन दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. तर मग दोन दिवस मी अंधेरीच्या पार्किंगमध्ये राहिले आणि तिथूनच ऑडिशनलाही गेले".
मालिकेत काम मिळाल्यानंतर भाषेचा लहेजावर काम केल्याचं काश्मिरानं सांगितलं. ती म्हणाली, "मी सांगलीची असल्यानं माझ्या भाषेचा लहेजा वेगळा होता. घाटी भाषा बोलायचे. पण नंतर मालिकेत तीन वर्ष काम केल्यानंतर रोहिणी हट्टंगडी ताईंमुळे माझ्या भाषेत सुधारणा झाली". सध्या कश्मिरा ही 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत रम्याची भूमिका साकारतेय.