"लहानपणीच वडिलांचं निधन झालं अन्...; 'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीच्या आयुष्याची भावुक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:47 IST2025-05-16T17:47:12+5:302025-05-16T17:47:56+5:30
"चार वर्षांची असताना वडिलांचं निधन अन्...",लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीने सांगितला संघर्ष काळ

"लहानपणीच वडिलांचं निधन झालं अन्...; 'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीच्या आयुष्याची भावुक कहाणी
Kashmira Kulkarni : 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर आणि विवेक सांगळे अशा तगड्या कलाकारांची स्टारकास्ट आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत काव्या-पार्थ, जीवा-नंदिनी या पात्रांसह रम्याची भूमिका साकारुन अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी प्रसिद्धीझोतात आली. सध्या कश्मिरा तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. 'वामा- लढाई सन्मानाची' असं या चित्रपटाचं नाव आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने कश्मिराने तिच्या स्ट्रगलिंग काळाविषयी सांगितलं आहे.
'वामा- लढाई सन्मानाची' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने 'सकाळ प्रिमिअरला' मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने संघर्ष काळातील आठवणी शेअर केल्या. त्यावेळी कश्मिरा म्हणाली,"माझी गोष्ट जवळपास सगळ्यांनी माहिती आहे. मी चार वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं. त्यामुळे अगदी जन्माला आल्यापासून माझा शिक्षणासाठी, खाण्या-पिण्यासाठी संघर्ष सुरु होता. दिवसभर शाळा झाली की रोज काहीतरी काम करायचं. पाच-सहा वर्षाचे असताना आपल्याला कोणी नोकरीला ठेवत नाही. पण, शेजारी वगैरे कोण असेल तर एखादी गोष्ट आणली, तर तुला खायला देईन असे ते म्हणायचे, ते दिवस मी पाहिले आहेत. "
त्यानंतर पुढे अभिनेत्रीने सांगितलं, "हॉटेलमध्ये बायका काम करायच्या. तिथे सगळं संपल्यावर शिल्लक राहिलेल्या गोष्टी त्या डब्यातून घरी घेऊन जायच्या. त्यांच्याकडून मग आई १०-१५ रुपयाला डबा विकत घ्यायची. जो दोन दिवसातून एकदा यायचा. पोटाला सवयच नव्हती, कारण तेव्हा अन्न मिळायचं नाही. माझा सराफ कट्ट्यातला जन्म आहे. त्यामुळे सोनारांच्या दुकानात जायचं आणि वर्गणी गोळा करायची. त्यातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं." असं अभिनेत्रीने या मुलाखतीमध्ये सांगितलं.