दिवाळीच्या हटके शुभेच्छा! कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची 'मंजुलिका आणि सूतळी बॉम्ब' अवतारात धमाल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:42 IST2025-10-20T09:41:39+5:302025-10-20T09:42:27+5:30
Kushal Badrike : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता कुशल बद्रिके याने दिवाळीच्या निमित्ताने एक अत्यंत मजेशीर आणि हटके पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दिवाळीच्या हटके शुभेच्छा! कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची 'मंजुलिका आणि सूतळी बॉम्ब' अवतारात धमाल पोस्ट
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता कुशल बद्रिके याने दिवाळीच्या निमित्ताने एक अत्यंत मजेशीर आणि हटके पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रेक्षकांना आपल्या विनोदी अभिनयाने हसवणाऱ्या कुशलने त्याची सहकारी अभिनेत्री आणि खास मैत्रीण श्रेया बुगडे हिच्यासोबतचा एक धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत श्रेया बुगडे ही 'मंजुलिका' या प्रसिद्ध भूमिकेच्या वेशात दिसत आहे, तर तो बाहुबली सिनेमातील एका पात्राच्या गेटअपमध्ये दिसत आहे. नेहमीप्रमाणेच कुशलने या पोस्टला भन्नाट कॅप्शन देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुशलने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आता या श्रेया बुगडेला बघा भुताच्या गेटअपमध्ये सुद्धा दिवाळीच्या कंदीलसारखी दिसते अगदी तेजस्वी; आणि मी पहा स्फोट झालेल्या सूतळी बॉम्ब सारखा दिसतोय. पण दिवाळीची खरी मज्जा ह्या दोन्ही गोष्टीं शिवाय नाहीच. आणि आज आम्ही तसेच दिसतोय, म्हणून आम्हा दोघांकडून ह्या अश्या शुभेच्छा. आनंदी रहा हसत रहा आणि तुमच्या वेडेपणात सामील होतील असेच मित्र जवळ बाळगा. दिवाळीच्या शुभेच्छा."
कुशल आणि श्रेया बुगडे यांची ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांच्या या मजेशीर पोस्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून, अनेकांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल
कुशल बद्रिके हा मराठीतील एक हरहुन्नरी अभिनेता आणि विनोदवीर आहे. त्याने 'चला हवा येऊ द्या', 'फू बाई फू' अशा लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रमातून घराघरात ओळख निर्माण केली आहे. विशेषतः 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील त्याची विविध पात्रे आणि विनोदी टायमिंग प्रेक्षकांना खूप भावते. टेलिव्हिजनसोबतच कुशलने 'एक होता काऊ', 'माझा नवरा तुझी बायको' आणि 'भाऊचा धक्का' यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि विनोदाने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.